शासकीय वसतिगृहातील जेवणात किडे; मुली जेवणाच्या ताटासह थेट तहसील कार्यालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 19:44 IST2024-10-11T19:44:37+5:302024-10-11T19:44:49+5:30
वैजापूर येथील शासकीय वसतिगृहातील प्रकार; समाजकल्याण अधिकाऱ्यांची वसतिगृहाला भेट

शासकीय वसतिगृहातील जेवणात किडे; मुली जेवणाच्या ताटासह थेट तहसील कार्यालयात
वैजापूर : येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या जेवणात गुरुवारी किडे आढळले. यामुळे जेवण न करता मुलींनी थेट तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांकडे तक्रार दिली.
ग्रामीण भागातील मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून शासनाच्या वतीने वैजापूर येथे शिवराई रस्त्यावर वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहात सध्या ग्रामीण भागातील ७५ मुली शिक्षणासाठी राहतात. त्या मुलींना दररोज नाश्ता, जेवण व फळे दिली जातात. मात्र दिल्या जाणाऱ्या नाश्ता व जेवणात अनेकवेळा किडे आढळत असल्याची तक्रार वसतिगृहातील मुलींनी अधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच नेहमी फळेही सडकी दिली जात असल्याचे सांगितले होते, मात्र याची कोणीही दखल घेतली नाही. गुरुवारी जेवणातही मुलींना किडे, अळ्या आढळल्या, त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वच मुलींनी जेवण न करता सदर जेवणाचे व सडक्या फळांचे नमुने घेऊन थेट तहसील कार्यालय गाठले व तेथे वसतिगृह प्रशासनाविषयी रोष व्यक्त करून ठिय्या आंदोलन केले. यानंतर तहसीलदारांनी सदर मुलींचे निवेदन स्वीकारले.
समाजकल्याण अधिकाऱ्यांची वसतिगृहाला भेट
वसतिगृहात मुलींना नेहमी निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. हे जेवण पुरविण्यासाठी ठेकेदार नेमण्यात आला आहे. जेवणाविषयी कायम तक्रारी असताना शासकीय वसतिगृहाचे अधिकारी दुर्लक्ष करतात. वाॅर्डन नेहमी गैरहजर राहतात. अशी मुलींची तक्रार आहे. गुरुवारी घडलेल्या घटनेची माहिती मिळताच समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांनी वसतिगृहास भेट देऊन मुलींच्या समस्या जाणून घेतल्या.