चिंता वाढू लागली लघुप्रकल्प अर्धेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:09 AM2017-10-29T01:09:28+5:302017-10-29T01:09:48+5:30
मान्सूनने दिलासा दिल्यानंतर परतीच्या पावसानेही समाधानकारक हजेरी लावल्यामुळे मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये चांगल्या प्रमाणात जलसाठा झालेला आहे, असे असले तरी लघु प्रकल्पांची स्थिती अद्यापही खालावलेलीच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मान्सूनने दिलासा दिल्यानंतर परतीच्या पावसानेही समाधानकारक हजेरी लावल्यामुळे मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये चांगल्या प्रमाणात जलसाठा झालेला आहे, असे असले तरी लघु प्रकल्पांची स्थिती अद्यापही खालावलेलीच आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील एकूण ८३२ लघु प्रकल्पांमध्ये केवळ ५४.२२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
मोठ्या जलप्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे सर्वत्र आनंदाचे चित्र रंगविण्यात येत आहे. मात्र, मोठ्या प्रकल्पांतील बहुतांश पाणी उद्योग आणि शहरांना मिळते. शेतकºयांना प्रत्यक्ष पाण्यासाठी लघुप्रकल्प अत्यंत उपयोगी असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये जलसाठा कमी असणे चिंतेची बाब आहे.
विशेष म्हणजे गेल्यावर्षी याच काळात मराठवाड्यातील एकू ण लघु प्रकल्पांमध्ये ८०.९४ टक्के पाणी उपलब्ध होते. म्हणजे गत वर्षाच्या तुलनेत सुमारे २६ टक्के पाण्याची तूट यंदा आहे. संपूर्ण राज्याचा विचार करता सर्व २८४६ लघु प्रकल्पांमध्ये केवळ ५५.१७ टक्के जलसाठा आहे.
मराठवाड्यातील लघु प्रकल्पांमध्ये सुमारे ६० टीएमसी उपयुक्त जलसाठ्याची क्षमता आहे. त्यापैकी सध्या ३२ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. प्रदेशातील ७९ मध्यम प्रकल्पांमध्ये ६३ टक्के (२३ टीएमसी) जलसाठा आहे.