चिंताजनक ! गलोगल्लीतील टाईमपास कट्ट्यावरील कॅरम, लुडो, पत्ते कोरोनाचे कॅरिअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 01:23 PM2020-05-18T13:23:03+5:302020-05-18T13:25:04+5:30
कंटेन्मेंट झोनमुळे गल्ल्या पोलीस यंत्रणेने बंद करून टाकल्या आहेत. त्यामुळे एरव्ही गल्लीबोळांतून होणारी पोलिसांची रात्रीची गस्त होत नाही.
औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर कडकडीत बंद पाळला जात असला तरी दाट लोकवस्तीत टाईमपास म्हणून गल्लीत उत्तररात्रीपर्यंत कॅरम, लुडो, पत्त्यांची मैफल बसते आहे. सोशल डिस्टन्सिंंगचा बोजवारा उडवीत कंटेन्मेंट झोनमध्ये सुरू असल्यामुळे कॅरम, लुडो, पत्ते कोरोनाचे कॅरिअर झाले आहेत.
कंटेन्मेंट झोनमुळे गल्ल्या पोलीस यंत्रणेने बंद करून टाकल्या आहेत. त्यामुळे एरव्ही गल्लीबोळांतून होणारी पोलिसांची रात्रीची गस्त होत नाही. परिणामी दिवसभर गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे, सोशल डिस्टन्सिंंग न ठेवता गप्पांचा फड रंगण्यासारखे प्रकार गुंठेवारी वसाहतींसह दाट लोकसंख्या असलेल्या परिसरात दिसून येत आहे. प्रशासन कम्युनिटी पोलिसिंग करण्यासाठी नागरिकांना सोबत येण्याचे आवाहन करीत असून, त्याला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते आहे.
संजयनगरप्रमाणेच म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर येथे गल्लोगल्लीत नागरिक कुठलेही सोशल डिस्टन्सिंंग न पाळता कॅरम, लुडो, खेळत असल्याचे दिसून येत आहे. अद्याप त्या भागात एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही; परंतु सोशल डिस्टन्सिंंग पाळले गेले नाही तर या भागातदेखील कोरोना हातपाय पसरू शकतो. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रशासन, पोलिसांनी वेळीच लक्ष देऊन या भागातील नागरिकांना समज देणे आवश्यक आहे. संजयनगर, रामनगर येथील कोरोनाग्रस्तांचे नातेवाईक मूर्तिजापूरमध्ये राहतात. त्यांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही, याची काळजी नागरिक आणि प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी होत आहे.
कम्युनिटी स्पिरिट राहिले तरच निभाव
कोरोनावर विजय मिळवायचा असेल, तर कम्युनिटी स्पिरिट महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात गर्दी, सोशल डिस्टन्सिंंग, बाहेरचे नागरिक येताना विचारपूस केली जाते. चार लोक उभे राहिले, तर गावाकडे त्यांना घरात जाण्यासाठी सांगण्यात येत आहे. तसे वातावरण शहरात दिसून येत नाही. प्रशासन जागृत राहा, काळजी घ्या, पोलिसिंग करण्यापलीकडे काय करणार, नागरिकांनी स्वत:हून टवाळखोरांना रोखले पाहिजे. स्वयंसेवक, कम्युनिटी पोलीस म्हणून पुढे येत प्रशासनाला मदत केली पाहिजे. कोरोनाचा प्रसार होईल, असे कृत्य जे करीत असतील त्यांना रोखले पाहिजे. कम्युनिटी स्पिरिट राहिले तरच शहराचा निभाव लागेल, असे मत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केले.
दोन पोलीस ठाणे हद्दीत प्रसार झपाट्याने
मुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोना रुग्णवाढीचा वेग मोठा आहे. त्यामुळे पोलिसांना कार्यक्षमता वाढवावी लागणार आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, पुंडलिकनगर, विद्यानगर, न्यायनगर, एन-४ मध्ये रुग्ण आढळून आले आहेत. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामनगर, संजयनगर, मुकुंदवाडी हद्दीत रुग्ण आढळले आहेत.