चिंताजनक ! औरंगाबादेत दोन दिवसात कोरोनाचे चार बळी; रुग्णसंख्या ६८८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 09:11 PM2020-05-13T21:11:52+5:302020-05-13T21:14:33+5:30
कोरोनाचा हा शहरातील १९ वा बळी ठरला आहे. तसेच आणखी चार पॉझिटिव्ह आढळून आल्याने रुग्णसंख्या ६८८ वर गेली आहे.
औरंगाबाद : शहरातील रहेमानिया कॉलनीतील ५९ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी मृत्यू झाला. या रुग्णाला आधीपासून मधुमेह, उचरक्तदाब होता, अशी माहिती खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. कोरोनाचा हा शहरातील १९ वा बळी ठरला आहे. तसेच आणखी चार पॉझिटिव्ह आढळून आल्याने रुग्णसंख्या ६८८ वर गेली आहे. शहरात दोन दिवसात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शहरात कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे बुधवारी सकाळी समोर आले. बीड बायपास परिसरातील अरुणोदय कॉलनीतील ९४ वर्षीय वृद्धेचा आणि गारखेडा परिसरातील हुसैन कॉलनीतील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सायंकाळी सिल्कमिल कॉलनी येथील एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या महिलेला मंगळवारी खाजगी रूग्णालयातून घाटीत रेफर करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे ४ वाजता महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरातील रहेमानिया कॉलनीतील ५९ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी मृत्यू झाला. या चार मृत्यूमुळे दोन दिवसात शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे.
आणखी ४ पॉझिटिव्ह,रुग्णसंख्या ६८८
दरम्यान, रहेमानिया कॉलनी, सिल्लेखाना आणि शहाबाजार येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या भोकरदन ब( जि. जालना) येथील २० वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेतील रुग्णसंख्या ६८८ झाली आहे.