चिंताजनक, औरंगाबादेत कोरोना मृत्युदर राज्यापेक्षा जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:02 AM2021-05-31T04:02:01+5:302021-05-31T04:02:01+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तीनशे खाली आली आहे. मात्र, तीन महिन्यांपासून कोरोनामुळे रोज रुग्णांचा बळी जात आहे. ...
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तीनशे खाली आली आहे. मात्र, तीन महिन्यांपासून कोरोनामुळे रोज रुग्णांचा बळी जात आहे. दररोज १५ ते २५ रुग्णांचा मृत्यू होत असून, मृत्युसत्र काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे. या सगळ्यात राज्यापेक्षा औरंगाबादेत कोरोनाचा मृत्युदर अधिक असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
औरंगाबादेत महिनाभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आलेख कमालीचा घसरला आहे. रोज एक ते दीड हजार रुग्णांचे निदान होत होते. परंतु, आता ही संख्या तीनशेखाली आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे अक्षरश: तांडव सुरू आहे. औरंगाबादेत शनिवारी कोरोना रुग्णांचा मृत्युदर थेट १०.०८ टक्के राहिला. या सगळ्या परिस्थितीमुळे औरंगाबादेतील मृत्युदर हा राज्यापेक्षा अधिक झाला. मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. मृत्यूची ही स्थिती दूर होण्यासाठी रुग्णांनी कोरोनाची लक्षणे दिसल्यावर आजार अंगावर काढता कामा नये; परंतु अनेक रुग्ण उपचारांसाठी वेळीच दाखल होत नाही. प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालय गाठले जाते. अशा परिस्थितीत मृत्यूचा धोका वाढतो. लक्षणे दिसल्यावर वेळीच रुग्णालयात दाखल झाल्यास कोरोनामुक्त होणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
-------
शहरापेक्षा ग्रामीण मृत्युदर अधिक
शहरापेक्षा ग्रामीण भागाचा मृत्युदर अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. मृत्यू पावणाऱ्या रुग्णांत ग्रामीण भागांतील रुग्णांचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारांसाठी थेट शहरात येण्याची वेळ ओढावत आहे.
कोरोनाचा रोजचा मृत्युदर
२३ मे - ६.१० टक्के
२४ मे - ५.२१ टक्के
२५ मे - ३.५३ टक्के
२६ मे - ५.३४ टक्के
२७ मे - ४.०१ टक्के
२८ मे - ५.८२ टक्के
२९ मे - १०.०८ टक्के
----
राज्याचा मृत्युदर - २.६ टक्के
-----
औरंगाबाद शहराची स्थिती
एकूण रुग्ण - ८५, ९५०
कोरोनामुक्त - ८३, १४१
मृत्यू - १,८४१
मृत्युदर - २.१४ टक्के
----
औरंगाबादेतील ग्रामीण स्थिती
एकूण रुग्ण - ५६, ३३७
कोरोनामुक्त - ५१,९१६
मृत्यू - १,३३५
मृत्युदर - २.३६ टक्के
------