ऐतिहासिक स्मारकांवर पूजा; अधिनियम काय आहे? इतिहासतज्ज्ञ काय म्हणाले?
By संतोष हिरेमठ | Published: July 1, 2024 03:14 PM2024-07-01T15:14:32+5:302024-07-01T15:15:17+5:30
ज्या ठिकाणी परवानगी आहे, तेथेच पूजा करता येते.
छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत काही भाविकांनी केलेले कीर्तन, भजन आणि देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यातील भारतमाता मंदिरात पूजेला नाकारलेल्या परवानगीचा मुद्दा गेला आठवडाभर चांगलाच चर्चेत राहिला. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने यासाठी कायदा पुढे केला. मात्र, राजकीय रेट्यामुळे त्यांना एक पाऊल मागे यावे लागले. या सगळ्यासंदर्भात इतिहासतज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले.
काय आहे अधिनियम?
‘नाॅन लिव्हिंग’ श्रेणीतील स्मारकांवरील मंदिरात पूजा, अर्चा करणे हे स्मारक आणि पुरातत्त्व स्थळ आणि अवशेष अधिनियम १९५८ आणि नियम १९५९ चे उल्लंघन मानले जाते.
धोरण बदलण्याचा विचार
'नॉन लिव्हिंग' स्मारके म्हणजे जिथे पूजा किंवा विधी केले जात नाहीत, तर 'लिव्हिंग' स्मारके म्हणजे जिथे सक्रिय धार्मिक पूजा आणि विधी होतात. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) नियमांनुसार जिथे स्मारके ताब्यात असताना धार्मिक कार्ये सुरू होती, केवळ त्या स्मारकांनाच ती सुरू ठेवण्याची परवानगी होती. उदाहरणार्थ कार्ले लेणी येथे एकवीरा देवीची धार्मिक पूजा चालू होती. जेव्हा 'एएसआय'ने तिचा ताबा घेतला, तेव्हापासून अजूनही चालू आहे; परंतु ताज्या माहितीनुसार 'एएसआय' धार्मिक महत्त्व असलेल्या संरक्षित स्मारकांमध्ये पूजेला परवानगी देऊन आपले धोरण बदलण्याचा विचार करत आहे.
- डॉ. दुलारी कुरेशी, इतिहासतज्ज्ञ
पुरातत्त्वीय कायद्यातील तरतुदीचे पालन व्हावे
जी स्मारके ‘लिव्हिंग’ या श्रेणीत आहेत, तेथे पूजाअर्चा करता येते. मात्र, ‘नाॅन लिव्हिंग’ स्मारकांवर कायद्यानुसार पूजा करण्यास परवानगी नाही. या कायद्याचे पालन केले पाहिजे.
- डाॅ. कामाजी डक, पुरातत्त्व अभ्यासक
स्मारके जपावी
प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळे आणि अवशेष कायद्यानुसार बेकायदेशीर धार्मिक विधी करता येत नाही. ज्या ठिकाणी परवानगी आहे, तेथेच पूजा करता येते. जेथे परवानगी नाही तेथे पूजा करता येत नाही. प्राचीन स्मारके ही जपली जावी.
- डॉ. संजय पाईकराव, सचिव, मूर्ती व शिल्प संशोधन संस्था, छत्रपती संभाजीनगर