देवाची भक्ती भीतीने नव्हे, तर श्रद्धेने करा: पं. धीरेंद्र शास्त्री महाराज
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 7, 2023 03:27 PM2023-11-07T15:27:57+5:302023-11-07T15:28:26+5:30
अयोध्यानगरी परिसर भाविकांनी बहरून गेला होता.
छत्रपती संभाजीनगर : देवाची भक्ती भीतीने नव्हे तर श्रद्धेने करा’, असा उपदेश पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज यांनी केला आणि लाखो भाविकांनी दोन्ही हात वर करीत ‘बागेश्वर धाम सरकार की जय’ असा जयजयकार केला. सकल हिंदू जनजागरण समिती व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा निमंत्रक डाॅ. भागवत कराड यांच्या वतीने आयोजित तीनदिवसीय हनुमान कथेला सोमवारी दुपारी ३:३० वाजता प्रारंभ झाला. अयोध्यानगरी परिसर भाविकांनी बहरून गेला होता.
विटकरी रंगाचा कुर्ता, पायजमा, गळ्यात त्याच रंगाचा दुपट्टा महाराजांनी घातला होता. हातात मोठ्या आकारातील रुद्राक्षांची माळ होती. ‘बोलो छत्रपती संभाजीनगर के पगलों’ अशी साद देताच सर्वांनी पुन्हा एकदा ’बागेश्वर धाम सरकार की जय’ अशी साथ दिली. महाराज म्हणाले की, अनेक जण मला म्हणतात की, महाराज, हे वय भजन म्हणायचे नाही आहे, त्यांना मी सांगतो की, अंतिम क्षण कधी येईल हे सांगता येत नाही. यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ‘राम’ नामाचा जप करा. ‘बजरंगबली देख तेरा हो गया हूँ’ या भजनात सर्व जण हरखून गेले होते. रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांनी श्री हनुमान कथेचे श्रवण केले. पहिली आरती, ३०० अर्चक, पुरोहित, विविध वेदशाळांचे १०० विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आली. सायंकाळची आरती मंत्री डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे, विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, उद्योजक मुकुंद भोगले, उल्हास गवळी, विश्व हिंदू परिषदेचे संजय बारगजे, महावीर पाटणी तसेच वाल्मीक समाज यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाली.
आकर्षक देखावा
पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज ज्या धर्मपीठावर बसले होते. त्यामागील बाजूस डोंगर व गुहेचा देखावा तयार करण्यात आला होता. गुहेमध्ये रामभक्त हनुमानाची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
सिंधी समाजातर्फे पाणी वाटप
सिंधी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी २० लिटरचे १ हजार जार आणले होते. येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी देण्याची जबाबदारी सिंधी समाजाने स्वीकारली आहे.
लाखभर भाविकांनी घेतला भंडाऱ्याचा आस्वाद
शीख समाजाच्या वतीने लंगरचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजेपासून भंडारा सुरू झाला. दिवसभरात लाखभर भाविकांनी भंडाऱ्याचा लाभ घेतला.