देवदर्शन की राजकारण : प्रवीण तोगडियांचा औरंगाबादमध्ये राहणार दोन दिवस मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:20 PM2018-02-09T12:20:44+5:302018-02-09T12:22:41+5:30
शनिवारी घृष्णेश्वर मंदिर, भद्रा मारुती आणि शनिशिंगणापूरचे दर्शन घेऊन प्रवीण तोगडिया रवाना होतील. दरम्यान, तोगडिया यांच्या आगमनामागचे खरे कारण हे देवदर्शन आहे की काही राजकारण आहे, याबाबत शहरातील राजकीय कार्यकर्त्यांत चर्चा होती.
औरंगाबाद : विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचा औरंगाबादेत दोन दिवस मुक्काम असून, गुरुवारी रात्री ८ वाजता त्यांचे विमानाने दिल्लीहून शहरात आगमन झाले. शहरात त्यांचा मुक्काम व येण्या-जाण्याच्या रस्त्यावर वरिष्ठ अधिकार्यांसह ७५० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे, अशी माहिती प्रभारी पोलीस आयुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली.
शहरात आगमन झाल्यावर ते काल्डा कॉर्नर येथील एका व्यक्तिकडे चहापानास गेले. तेथून बीड बायपास रस्त्यावरील आणखी एका व्यक्तिकडे ते रात्री मुक्कामी होते. श्रीरामे यांनी सांगितल्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी ते सकाळी परभणीकडे रवाना होतील. रात्री औरंगाबादेत परत येऊन पुंडलिकनगर रोडवरील एका परिचिताच्या घरी मुक्कामी राहतील. शनिवारी घृष्णेश्वर मंदिर, भद्रा मारुती आणि शनिशिंगणापूरचे दर्शन घेऊन ते रवाना होतील. दरम्यान, तोगडिया यांच्या आगमनामागचे खरे कारण हे देवदर्शन आहे की काही राजकारण आहे, याबाबत शहरातील राजकीय कार्यकर्त्यांत चर्चा होती.
झेड प्लस सुरक्षा आणि दिमतीला ताफा
तोगडिया यांचे आगमन व दोन दिवसांच्या मुक्कामाने पोलिसांची चांगलीच धावपळ होणार असे दिसते. घातपातविरोधी पथकाकडून रहदारीचा मार्ग तसेच मुक्काम, चहापान, भोजन इत्यादी ठिकाणी तपासणी केली जात असून, बंदोबस्तही लावला आहे. २ पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, १७ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखेचे ३०० कर्मचारी, ४०० पोलीस कर्मचारी, विशेष पोलीस अधिकारी, ३ स्ट्राईंिकंग फोर्स, असा ताफा त्यांच्या दिमतीला राहणार आहे.