‘व्हॉटस्अॅप’द्वारे साहित्यप्रेमींना एकत्र आणण्याचा स्तुत्य प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:42 PM2018-12-30T22:42:38+5:302018-12-30T22:42:58+5:30
व्हॉटस्अॅपसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साहित्यप्रेमींना एकत्र आणणे अतिशय स्तुत्य असून, हा सोशल मीडियाचा खऱ्या अर्थाने विधायक वापर
औरंगाबाद : व्हॉटस्अॅपसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साहित्यप्रेमींना एकत्र आणणे अतिशय स्तुत्य असून, हा सोशल मीडियाचा खऱ्या अर्थाने विधायक वापर असल्याचे मनोगत साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान आयोजित दुसºया राज्यस्तरीय साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या सर्व साहित्यिकांनी एकमुखाने व्यक्त केले.
रविवारी मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार दुर्गेश सोनार हे संमेलनाध्यक्ष होते. आ. अतुल सावे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज तौर, पी. विठ्ठल, उत्तम बावस्कर, के. एस. अतकरे, डॉ. दैवत सावंत, सायराबानो चौगुले, सागरराजे निंबाळकर, डॉ. राज रणवीर, मुरलीधर जगताप यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रास्ताविकातून संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली आणि व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून साहित्यप्रेमी एकत्र येत असून, त्यातून साहित्य संमेलन कसे आकाराला येत गेले, याविषयी माहिती दिली.
मान्यवरांच्या हस्ते ‘कथा नवलेखकांच्या’ या कथासंग्रहाचे तसेच ई- बुक कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. मानवी जीवन समजून घेतले तरच साहित्य समजून घेता येते, अशा शब्दांत डॉ. तौर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सध्याचा काळ हा कसोटीचा असून, या काळात आपण साहित्यिक म्हणून व्यक्त होणे, आत्यंतिक गरजेचे असल्याचे सोनार यांनी सांगितले. तर साहित्यिकांना योग्य असा मान, सन्मान, महत्त्व मिळत नसल्याची खंत आ. सावे यांनी व्यक्त केली. संदीप ढाकणे, आशा डांगे यांनी संचालन केले.
संमेलनाच्या दुसºया सत्रात डॉ. तौर यांच्या अध्यक्षतेखाली ‘समाज माध्यमे आणि वाचन संस्कृती’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यानंतर सायराबानो चौगुले आणि अरुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेगवेगळी कविसंमेलने उत्स्फू र्तपणे पार पडली.
साहित्य संमेलनातील पुरस्कार विजेते
१. साहित्य काव्यगंध प्रा. डॉ. नरेंद्र मारवाडे स्मृती पुरस्कार- डॉ. विद्या सुर्वे- बोरसे.
२. साहित्य काव्यगंध स्व. नारायणराव डांगे स्मृती साहित्यप्रभा पुरस्कार- डॉ. पृथ्वीराज तौर.
३. साहित्य काव्यगंध जीवन गौरव पुरस्कार- डॉ. शरयू शहा
४. साहित्य काव्यगंध संघर्षयात्री पुरस्कार- कवी आकाश देशमुख.