जखमेला मुंग्या... वेदनेने विव्हळत त्याने घाटी रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडला श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:53 AM2021-03-17T11:53:36+5:302021-03-17T11:59:52+5:30
अपघात विभागाच्या पायऱ्यांवरच जखमीचा अनेक तास पडून असताना मृत्यू
औरंगाबाद : पायाला जखम झालेली आणि त्या जखमेला मुंग्या लागलेल्या, माश्या घोंगावत होत्या, अशा अवस्थेत एक व्यक्ती घाटीतील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होता, येणारे-जाणारे पाहून पुढे जात होते. पण काहींनी अपघात विभागातील डाॅक्टरांना माहिती दिली. मात्र, वेळीच कोणीही त्यांच्याकडे धावले नाही. शेवटी पडल्या जागेवरच त्याने अखेरचा श्वास घेतला. मृत्यू झाल्यानंतर त्याला अपघात विभागात दाखल करण्यासाठी यंत्रणेने धावपळ केली.
घाटीतील अपघात विभागासमोर पडून असलेल्या या व्यक्तीविषयी के.के. ग्रुपचे उपाध्यक्ष किशोर वाघमारे, अक्षय दांडगे यांनी डाॅक्टरांना माहिती दिली. परंतु त्यानंतरही कोणीही वेळीच दखल घेतली नाही, अशी ओरड होत आहे. सदर व्यक्तीला कोणीतरी घाटीत सोडून गेल्याची शक्यता घाटी प्रशासनाने व्यक्त केली. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे म्हणाले, या व्यक्तीला ज्यांनीही घाटीत सोडले, त्यांनी अपघात विभागात दाखल करणे गरजेचे होते. या व्यक्तीला कर्मचाऱ्यांनी अपघात विभागात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्याची ओळखी पटलेली नाही.
..तर वाचले असते प्राण
एका कोरोना रुग्णाला दाखल करताना अपघात विभागासमोर सदर व्यक्ती पडून असल्याचे दिसले. त्याच्या पायाला झालेल्या जखमेला मुंग्या झाल्या होत्या. तोपर्यंत तो जिवंत होता. त्याविषयी अपघात विभागातील डाॅक्टरांना माहिती दिली. तसेच ‘आरएमओ’ यांनाही माहिती दिली. पण दोन तासांनंतरही कोणीही आले नाही. शेवटी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. वेळीच त्याच्यावर उपचार केले असते तर प्राण वाचले असते, असे के.के. ग्रुपचे उपाध्यक्ष किशोर वाघमारे म्हणाले.