भारीच! शासकीय दंत महाविद्यालयात आणखी एक ‘पीजी’ अभ्यासक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:30 IST2025-02-19T18:30:02+5:302025-02-19T18:30:44+5:30
आता नऊ पैकी आठ विषयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम

भारीच! शासकीय दंत महाविद्यालयात आणखी एक ‘पीजी’ अभ्यासक्रम
छत्रपती संभाजीनगर : शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात ‘सामाजिक दंतशास्त्र’ विषयात पदव्युत्तर पदवी (एम. डी. एस) अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. २०२५-२६ या वर्षासाठी तीन विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील.
शासकीय दंत महाविद्यालयात आतापर्यंत आठ विषयांत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम होते. आता त्यात आणखी एका अभ्यासक्रमाची भर पडली आहे. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ‘सामाजिक दंतशास्त्र’ (पब्लिक हेल्थ डेन्टिस्ट्री) या विषयात ‘पीजी’ सुरू होणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त राजीव निवतकर, सहसंचालक (दंत) डाॅ. विवेक पाखमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता डाॅ. माया इंदूरकर, सामाजिक दंतशास्त्र विभागप्रमुख डाॅ. जगदीशचंद्र वठार, डाॅ. हर्षल बाफना आदींनी यासाठी प्रयत्न केले. शासकीय दंत महाविद्यालयात आता ९ पैकी केवळ एका म्हणजे बालदंतरोगशास्त्र विषयात ‘पीजी’ सुरू होणे बाकी आहे. यासाठी महाविद्यालय प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
सध्या सुरू असलेले ‘पीजी’ अभ्यासक्रम
विषय - विद्यार्थी संख्या
कृत्रिम दंतशास्त्र- ६
दंत शल्यशास्त्र - ३
मुख शल्यशास्त्र- ३
दंत परिवेष्टन शास्त्र- ३
मुख विकृती शास्त्र- ३
मुखरोग निदान व क्ष-किरण- ३
दंत व्यंगोपचार शास्त्र- ३
‘बालदंतरोगशास्त्र’साठी प्रयत्नशील
सामाजिक दंतशास्त्र विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. महाविद्यालयातील हा आठवा ‘पीजी’ अभ्यासक्रम ठरला आहे. आता बालदंतरोगशास्त्र विषयातही ‘पीजी’ सुरू होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
-डाॅ. माया इंदूरकर, अधिष्ठाता