व्वा! छत्रपती संभाजीनगरहून पुण्यापाठोपाठ जालना, बीडचाही प्रवास होणार ई-बसने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 07:20 PM2024-08-27T19:20:09+5:302024-08-27T19:21:00+5:30
ऑक्टोबरमध्ये येणार ७४ ई-बस : ६ आगारांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाला ‘स्पीड’
छत्रपती संभाजीनगर : पुणे मार्गावर सध्या ई-बस धावत आहेत. लवकरच जालना, बीडसह इतर मार्गांवर ई-बस धावताना दिसतील. एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरला २१४ ई-बस मिळणार असून, यात पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये ७४ ई-बस दाखल होतील. यासाठी जिल्ह्यातील ६ आगारांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाला गती देण्यात येत आहे.
राज्यभरात ५ हजार ई-बस टप्प्याटप्प्यात दाखल होत होत आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागाला दिवाळीपूर्वी ७४ ई-बस मिळण्याची शक्यता आहे. या बसच्या दृष्टीने सिडको बसस्थानकासाठी चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेच्या परिसरात चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. त्याबरोबरच पैठण, सिल्लोड, वैजापूर येथेही चार्जिंग स्टेशनचे काम सध्या सुरू आहे. लवकरच कन्नड आणि गंगापूर येथील चार्जिंग स्टेशनचे काम सुरू होणार आहे.
एकाच वेळी २८ बसचे चार्जिंग
एकाच वेळी २८ बसचे चार्जिंग होईल, अशी सुविधा चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेच्या परिसरात होत आहे. एकदा चार्ज झाल्यानंतर जवळपास ३०० किमी अंतर ई-बस धावेल.
सध्या किती ई-बस?
विभागात सध्या ५ ई-बस आहेत. या ५ बसेस आणि पुणे विभागाच्या ५ अशा एकूण १० बसेस छत्रपती संभाजीनगर-पुणे मार्गावर धावत आहेत. लवकरच ई-बसची संख्या वाढेल.
८० टक्के काम पूर्ण
चार्जिंग स्टेशनसाठी ८० टक्के सिव्हिल वर्क पूर्ण झाले आहे. केबलचेही काम झालेले आहे. चार्जिंग स्टेशनचे काम सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. ऑक्टोबरमध्ये ई-बसेस दाखल होण्याची शक्यता आहे.
- पंडित चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी