व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून दीड वर्षात ७ लाखांवर प्रवाशांची हवाई सफर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 11:34 AM2024-08-05T11:34:04+5:302024-08-05T11:34:31+5:30
प्रवासी संख्येत वाढ, मुंबई, दिल्लीला सर्वाधिक प्रवासी
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या दीड वर्षात तब्बल ७ लाखांवर प्रवाशांनी हवाई सफर केली आहे. यात सर्वाधिक प्रवास दिल्ली, मुंबईसाठी करण्यात आला आहे.
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षात चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ६ लाख २३ हजार ९१५ प्रवाशांनी प्रवास केला, तर ५ हजार ७९९ विमान उड्डाणे नोंदवली गेली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी ५० हजारांवर प्रवाशांची नोंद झाली. प्रवाशांच्या संख्येत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३७ टक्के वाढ झाली आहे, तर विमान उड्डाण संख्येत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे अक्षय चाबूकस्वार यांनी दिली.
विमान प्रवाशांची संख्या (एप्रिल २०२३ ते मार्च २०२४)
शहर- प्रवासी संख्या
दिल्ली-२,२१,११६
मुंबई- २,४८,२०१
बंगळुरू- ५४,६४६
हैदराबाद- ९१, ८०८
२०२४ मधील विमान प्रवासी
महिना- प्रवासी संख्या
जानेवारी - ५७,१५०
फेब्रुवारी- ५२,६३६
मार्च-५४,३७२
एप्रिल-५०,०४०
मे- ५८,३९५
प्रवासी संख्या आणखी वाढेल
विमानतळाच्या आकडेवारीत वाढ झाली आहे, हे साहजिकच आहे. कोविड प्रतिबंध हटताच प्रवासी संख्या वाढतच गेली. चिकलठाणा विमानतळावर वर्षाला ३ ते ४ लाख प्रवासी संख्या असायची, ती आता २०२३ पासून ६.२५ लाखांच्या घरात गेली आहे. ही खूप मोठी वाढ आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी विमानसेवा असूनही व आंतरराष्ट्रीय प्रवासी वगळता २०२३ मध्ये प्रवासी संख्या ६ लाख पार गेली होती. आता अहमदाबाद, लखनौ-नागपूर-गोवा विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवासी संख्या ही २०२४ अखेर ७ लाख पार करेल, अशी शक्यता आहे.
- अक्षय चाबूकस्वार, एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप
पाठपुरावा सुरू आहे
९ विमानांची ये-जा विमानसेवेत आणि प्रवासी संख्येत वाढ होत आहे. दिवसभरात ९ विमानांची ये-जा होत आहे. छत्रपती संभाजीनगरहून नव्या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा आणि प्रयत्न सुरू आहे.
- शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ.