व्वा..! रुग्णांचीही ‘हॅपी दिवाली’, मोतीचूर, गुलाबजामचा आस्वाद
By संतोष हिरेमठ | Published: November 13, 2023 12:52 PM2023-11-13T12:52:55+5:302023-11-13T12:53:25+5:30
घाटी, शासकीय कर्करोग रुग्णालय, ‘सिव्हिल’मधील रुग्णांना सुखद धक्का
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालय (राज्य कर्करोग संस्था) आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्णांना रविवारी जेवणात गोडाधोडाचे जेवण देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. मिक्स व्हेज, पुलाव, आलू मटर, मोतीचूर लाडू, गुलाबजाम असे मिष्टान्न भोजन देण्यात आले.
दिवाळीनिमित्त घाटी, शासकीय कर्करोग रुग्णालय, जिल्हा रुग्णालयासह शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. गोरगरीब रुग्णांचे आधारवड असलेल्या घाटीत दुपारच्या जेवणात मिष्टान्न भोजन देण्यात आले. यामध्ये यंदा पोळी, मिक्स व्हेज, पुलाव, मोतीचूर लाडू असा बेत होता. सुमारे ५७५ रुग्णांना हे भोजन देण्यात आल्याची माहिती आहारतज्ज्ञ मंजू मंठाळकर यांनी दिली. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी नियोजन करण्यात आले. घाटी रुग्णालयाबरोबरच शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल कर्करुग्णांनाही मिष्टान्न भोजन देण्यात आले.
‘सिव्हिल’मध्येही मस्त मेजवानी
जिल्हा सामान्य रुग्णालयात दाल तडका, आलू मटर, जिरा राईस, पोळी, गुलाबजाम असा बेत होता. सोबत फराळही देण्यात आला. रुग्णालयातील जवळपास ६० रुग्णांना मिष्टान्न भोजन देण्यात आल्याची माहिती आहारतज्ज्ञ रश्मी जोशी यांनी दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. पद्मजा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी नियोजन करण्यात आले.