लेखकांनी समाजात परिवर्तन घडविणारे, विषमतेवर हल्ला करणारी नाटकं लिहावीत; राजा ढाले यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 06:34 PM2018-02-05T18:34:57+5:302018-02-05T18:37:56+5:30
समाजातील ‘जाती-पाती, उच्च-नीच’ तेची मनोवृत्ती मोडून काढण्यासाठी विषमतेवर हल्ला करणार्या नाटकांची निर्मिती होणे काळाची गरज बनले आहे. लेखकांनी समाजात परिवर्तन घडविणारे वैचारिक नाटक लिहावे व कलाकारांनीही तेवढाच जिवंत अभिनय करावा, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत राजा ढाले यांनी केले.
औरंगाबाद : समाजातील ‘जाती-पाती, उच्च-नीच’ तेची मनोवृत्ती मोडून काढण्यासाठी विषमतेवर हल्ला करणार्या नाटकांची निर्मिती होणे काळाची गरज बनले आहे. लेखकांनी समाजात परिवर्तन घडविणारे वैचारिक नाटक लिहावे व कलाकारांनीही तेवढाच जिवंत अभिनय करावा, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत राजा ढाले यांनी केले.
प्रा. त्र्यंबक महाजन व डॉ. कमलाकर गंगावणे संपादित ‘युगयात्रा प्रवाहातील रंगसंहिता’ या ग्रंथाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात आयोजित प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुलेकर होते. ढाले पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्याच्या जगाचा ‘डोळा’ आहे. त्यांनी जगाला दिलेल्या ‘समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्व’ या विचारांवर आधारित ‘मानवतेची परिभाषा शिकविणारे ‘नाटक’ तयार करायला हवे. प्रा. अविनाश डोळस म्हणाले की, ज्यांनी इतिहास घडविला ते इतिहास लिहीत नाही, यामुळे नंतर खोटा इतिहास समोर येतो. ‘मिलिंद’मधील दलित नाट्य चळवळीचा महान इतिहास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी लिहून दस्तावेज तयार करावा.
युगयात्रा ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने प्रा. विजयकुमार गवई यांनी ‘मिलिंद’मधील नाट्य चळवळीच्या आठवणी सर्वांना सांगितल्या. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा भक्कम वारसा लाभलेल्या दलित रंगभूमीने मराठी नाट्यसृष्टीला विचारावर आधारित अशी नाटके दिली, असा विचार प्रा. अजित दळवी यांनी मांडला. अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी सर्वप्रथम ‘युगयात्रा प्रवाहातील रंगसंहिता’ ग्रंथाचे संपादन केल्याबद्दल प्रा. त्र्यंबक महाजन व डॉ. कमलाकर गंगावणे यांचे अभिनंदन केले. या ज्येष्ठ लेखकांच्या मार्गदर्शनाखाली ‘नागसेनवन’चा वैभवशाली सांस्कृतिक इतिहास लिहिला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन करून भारत शिरसाट यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य प्रभाकर बागले, प्रा. प्रकाश त्रिभुवन, डॉ. आर. के. क्षीरसागर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मिलिंदमध्ये दलित नाट्य चळवळीचे मूळ रुजले
प्रा. त्र्यंबक महाजन म्हणाले की, मिलिंद महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत: बसून ‘युगयात्रा’ हे नाटक पाहिले. त्यानंतर खर्या अर्थाने येथे दलित नाट्य चळवळीचे बीज रुजल्या गेले. या नाट्य चळवळीचे नाव देशात पोहोचले. त्यावेळी ब्राह्मणाची भूमिका दलित कलाकार करीत असत, तर दलिताची भूमिका ब्राह्मण कलाकार करीत असत, असे एकीचे वातावरण होते.
सांस्कृतिक, ऐतिहासिक दस्तावेज
डॉ. कमलाकर गंगावणे म्हणाले की, २० व्या शतकाच्या ७ व्या दशकात दलित साहित्य नाट्य चळवळ सुरू झाली. तेव्हा नागसेनवन हे चळवळीचे केंद्रंिबंदू होते. ‘युगयात्रा प्रवाहातील रंगसंहिता’हा ग्रंथ सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दस्तावेज आहे.