आरएसएस शाखेत शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास शिकविला जातो, सुषमा अंधारेंचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 02:59 PM2022-11-21T14:59:15+5:302022-11-21T15:00:10+5:30
दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसणे म्हणजे हिंदुत्व, अशी हिंदुत्वाची व्याख्या आहे.
औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास शिकविला जातो, खोटा इतिहास शिकविणाऱ्यांना तेव्हाच ठेचले असते तर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करण्याची हिंमत झाली नसती, अशी सडेतोड टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर केली.
औरंगाबाद शिवसेना शाखेच्या वतीने रविवारी रात्री टीव्ही सेंटर येथे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला संपर्कप्रमुख आ. मनीषा कायंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदू घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, महिला आघाडी शहरप्रमुख प्रतिभा जगताप, सुनीता देव यांची उपस्थिती होती. फायर ब्रॅण्ड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंधारे यांना ऐकण्यासाठी टीव्ही सेंटर येथील मैदानावर मोठी गर्दी होती.
अंधारे म्हणाल्या की, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि वाढत्या महागाईवर विरोधकांनी आणि सामान्य जनतेने प्रश्न विचारू नयेत, यासाठी भाजपकडून हिंदुत्वाचे, धर्माचे भावनिक राजकारण करून सत्तेच्या पोळ्या भाजल्या जातात. दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसणे म्हणजे हिंदुत्व, अशी हिंदुत्वाची व्याख्या आहे. विदेशी पाहुणे भारतात येतात तेव्हा मोदी त्यांना घेऊन एकदाही सावरकरांचे गाव असलेल्या भगूरला नेत नाहीत, तर महात्मा गांधींच्या आश्रमात नेतात. देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रद्रोही धोरण असल्याचा आरोपही त्यांनी केला. अंबादास दानवे म्हणाले, सिडको, हडकोच्या फ्री होल्डचा प्रश्न मार्गी लावल्याचे एका आमदाराने होर्डिंग लावले होते. मात्र ते सर्व खोटं होते. राज्यात आम्ही प्रयत्न केले; परंतु नगरविकास मंत्र्यांनी त्यात खोडा घातला. तनवाणी यांनी ही गर्दी लक्षात घेता शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला. खैरे, घोसाळकर, आ. कायंदे यांचीही भाषणे झाली.
कोश्यारी राज्यपाल कमी आणि भाजपचा कार्यकर्ताच अधिक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आजपर्यंतची कारकीर्द राज्यपाल कमी आणि भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ताच जास्त अशी आहे, स्त्री शिक्षणाचा आदर्श ठेवणाऱ्या क्रांतिज्योती जोतिबा फुले यांच्याबद्दल वाईट वक्तव्य त्यांनी केले होते. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही ते बोलले.