औषधनिर्माणच्या परीक्षेत चुकीची प्रश्नपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:34 PM2019-05-22T23:34:02+5:302019-05-22T23:34:26+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षेत चुकीची प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. त्यानंतर पाठविलेल्या दुसºया प्रश्नपत्रिकेतही अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. परीक्षा विभागाने पहिली चूक मान्य केली. मात्र, प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आले नसल्याचे स्पष्ट केले.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षेत चुकीची प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. त्यानंतर पाठविलेल्या दुसºया प्रश्नपत्रिकेतही अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. परीक्षा विभागाने पहिली चूक मान्य केली. मात्र, प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आले नसल्याचे स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या व्यावसायिक परीक्षांना १६ मे पासून सुरुवात झाली आहे. मात्र, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल रखडल्यामुळे या परीक्षा २१ मे पासून सुरू झाल्या आहेत. बुधवारी फार्मास्युटिकल आॅर्गेनिक केमिकल-१ या विषयाचा सकाळी १० ते १ यादरम्यान पेपर होता. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्यानंतर हा आमचा पेपर नाही, अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न दिले आहेत, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. त्यानंतर परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाला. ही बाब विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला कळविण्यात आली. परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. गणेश मंझा यांनी तातडीने पावले उचलत योग्य तो पेपर उपलब्ध करून दिला. यात अर्ध्या तासापेक्षा अधिकचा कालावधी गेला. हा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. याविषयी बोलताना डॉ. मंझा म्हणाले, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांसाठी संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या. फॉर्मास्युटिकल आॅर्गेनिक केमिकल-१ विषयाचे ७५ गुण आणि ८० गुणांचे अनुक्रमे ७१४ आणि ७१९ असे प्रश्नसंच तयार करण्यात आले होते़ नजरचुकीने ७५ गुण असलेले पेपर विद्यार्थ्यांना देण्याचे सांगण्यात आले. ७५ गुणांची प्रश्नपत्रिका दिल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला़ प्रश्नपत्रिकेत ‘आऊट आॅफ सिल्याबस’ नव्हता, तर तो बदललेल्या पॅटर्नमुळे गोंधळ उडाला. मात्र, चूक दुरुस्त झाल्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राजीनामा स्वीकारणार नाही : कुलगुरू
परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. गणेश मंझा यांनी ‘नॅक’चे मूल्यांकन होईपर्यंत परीक्षा विभागाचा पदभार घेतला होता. नॅकचे मूल्यांकन झाल्यामुळे हा पदभार काढून घेण्यात यावा, अशी विनंती करणारा मेल त्यांनी कुलगुरूंना केला होता. याविषयी कुलगुरू डॉ. चोपडे यांना विचारले असता, त्यांनी हा दावा फेटाळून लावला, तसेच डॉ. मंझा यांनी राजीनामा दिला तरीही तो स्वीकारणार नाही, त्यांच्याकडे संगणकाचे ज्ञान असल्यामुळे ते परीक्षा विभागात चांगले काम करीत आहेत, असे प्रशस्तीपत्रही कुलगुरू डॉ. चोपडे यांनी दिले. यामुळे राजीनाम्याचा विषय मागे पडण्याची शक्यता आहे.