एमए इंग्रजीच्या पेपरमध्ये चुकीचे प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:04 AM2021-05-12T04:04:22+5:302021-05-12T04:04:22+5:30
औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मंगळवारी ११ मे रोजी घेण्यात आलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेत चुकीचे प्रश्न ...
औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मंगळवारी ११ मे रोजी घेण्यात आलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेत चुकीचे प्रश्न आल्यामुळे विद्यार्थ्यांचा काहीकाळ गोंधळ उडाला. एम.ए. प्रथम वर्ष इंग्रजीच्या पहिल्या सेमिस्टरसाठी दुसऱ्या सेमिस्टरचे काही प्रश्न विचारण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी तत्परता बाळगत आयटी समन्वयकांमार्फत विद्यापीठ परीक्षा विभागाकडे यासंबंधीची तक्रार केली.
दरम्यान, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी या घटनेला दुजोरा दिला असून यासंबंधी काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात संबंधित पेपर सेटरकडे खातरजमा करुन चुकीचे प्रश्न विचारलेले असतील, तर संबंधित प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना दिले जातील, असे सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने औरंगाबादेतील विद्यापीठाचा मुख्य परिसर, उस्मानाबाद येथील उपपरिसर तसेच संलग्नित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मेपासून सुरु झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमाचे सर्वच पेपर ऑनलाईन पद्धतीने घेतले आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ही परीक्षा २६ मे पर्यंत चालणार आहे. दुसरीकडे, पदवी अभ्यासक्रमाची १५ एप्रिलपासून स्थगित करण्यात आलेली परीक्षा ३ मेपासून सुरु करण्यात आली. मंगळवारी दिवसभरात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सकाळच्या सत्रात ५५ हजार ४८३, तर दुपारच्या सत्रात १० हजार ४२५ विद्यार्थ्यांनी असे एकूण ६५ हजार ९०८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली.