महावितरणकडून चुकीचे रिडिंग; दीड हजार ग्राहकांच्या बिलांची केली दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 02:03 PM2018-10-27T14:03:24+5:302018-10-27T14:03:54+5:30
निष्काळजीपणा केल्यामुळे अनेकदा मीटर रीडिंगसाठी नेमण्यात आलेल्या एजन्सींकडून चुकीची मीटर रीडिंग घेतली जात असल्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
औरंगाबाद : कधी वीज ग्राहकांकडून पैसे घेऊन, तर कधी निष्काळजीपणा केल्यामुळे अनेकदा मीटर रीडिंगसाठी नेमण्यात आलेल्या एजन्सींकडून चुकीची मीटर रीडिंग घेतली जात असल्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने उपविभागस्तरावर वीज बिल दुरुस्तीची मोहीम हाती घेतली असून, महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत आतापर्यंत १ हजार ५२६ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत.
महावितरण कंपनीकडून वीज बिल रीडिंगसाठी खाजगी संस्था (एजन्सी) नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. मीटर रीडिंग एजन्सीच्या चुकांमुळे अनेकदा काही ग्राहकांना देण्यात आलेल्या वीज बिलासंबंधीच्या तक्रारी महावितरण उपविभागस्तरावर प्राप्त होत आहेत. नियमानुसार या तक्रारी सहा महिन्यांच्या आत उपविभागस्तरावर निपटारा झाला पाहिजे. परंतु तिथे तक्रारींचा निपटारा होत नसल्यामुळे महावितरण प्रादेशिक कार्यालयाकडे आॅनलाईनद्वारे यासंबंधीच्या तक्रारी केल्या जात आहेत. आतापर्यंत महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ११ जिल्ह्यांतील १५१ उपविभागांतून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्थळ निरीक्षण अहवाल, मीटर बदली अहवाल, मीटर परीक्षण अहवाल, ग्राहकांच्या स्थितीचा अहवाल आदी कागदपत्रे ई-मेलद्वारे प्रादेशिक कार्यालयामार्फ त मागविण्यात आली. त्यानंतर सदर प्रकरणे लेखा विभाग, तांत्रिक विभाग, अधीक्षक अभियंता यांच्याकडून शहानिशा केल्यानंतर आॅनलाईन प्रणालीद्वारे ती निकाली काढण्यात आली.एजन्सीकडून घेण्यात आलेल्या रीडिंगबाबत वीज बिलांच्या तक्रारी कमी करण्यासाठी महावितरणकडून मीटर रीडिंगची फेरपडताळणी करण्यात येत आहे. प्रादेशिक कार्यालयाकडे आॅनलाईन २ हजार ७९६ वीज बिलांच्या तक्रारी प्राप्त असून, तक्रारी सोडविण्याठी लागणारी आवश्यक कागदपत्रे संबंधित ई-मेलद्वारे मागविण्यात आलेली आहेत.
आतापर्यंत १ हजार ५२६ तक्रारींचा निपटारा
यासंदर्भात प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले की, यापूर्वी औरंगाबाद परिमंडळातून ३८५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ३५४ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. जळगाव परिमंडळातून ४६४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ४०७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. लातूर परिमंडळात प्राप्त ७६१ तक्रारींपैकी ६६७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. नांदेड परिमंडळातून १३३ तक्रारींपैकी ९८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. आजपर्यंत अशा एकूण १ हजार ७४३ प्राप्त तक्रारींपैकी १ हजार ५२६ वीज बिलांच्या तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.