पंचांगाचा चुकला अंदाज
By Admin | Published: August 27, 2014 12:43 AM2014-08-27T00:43:30+5:302014-08-27T00:43:30+5:30
उदगीर : पावसाअभावी उदगीर तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात सापडलेला आहे़ पेरणीनंतर हुलकावणी दिलेल्या पावसामुळे जवळपास ३० ते ४० टक्के पिकाचे नुकसान झाले आहे़
उदगीर : पावसाअभावी उदगीर तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात सापडलेला आहे़ पेरणीनंतर हुलकावणी दिलेल्या पावसामुळे जवळपास ३० ते ४० टक्के पिकाचे नुकसान झाले आहे़ उर्वरित पिकेही वाळून जात असतानाच मघा नक्षत्राचा उत्तरार्ध बळीराजाला पावला़ ऐन पोळ्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे उरल्या-सुरल्या पिकांना जीवदान मिळण्याची आशा शेतकरी बाळगून आहेत़ दरम्यान, पंचागकर्त्यांनी मघा नक्षत्राबद्दलचा वर्तविलेला अंदाजही ‘लहरी’ वरुणराजाने चुकविला आहे़
यंदाच्या हंगामात उदगीर तालुक्यात आजतागायत केवळ ३० टक्के इतकाच पाऊस झाला आहे़ त्यामुळे जलसाठे अजूनही कोरडेठाक आहेत़ पावसाच्या पाच नक्षत्रात जेमतेम पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, औषधे खरेदी करुन पेरणी केली़ मात्र त्यानंतर पाऊस गायब झाल्याने कुठे दुसऱ्यांदा तर कुठे तिसऱ्यांदा पेरणी करावी लागली़ तरीही पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांची नगदी समजली जाणारे उडीद, मूग ही पिके पूर्णत: वाया गेली़
सोयाबीन व अन्य पिके वाळून जाण्याच्या मार्गावर असतानाच ‘मघा’ नक्षत्राने बळीराजाला मदतीचा हात दिला़ ‘तुझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई़़़’ या काव्यपंक्तीप्रमाणे मघाच्या उत्तरार्धात झालेल्या या पावसामुळे भुई नवतेजाने बहरु लागली आहे़
सोमवार व मंगळवार अशा दोन्ही दिवशी उदगीर तालुक्यात पाऊस झाला़ सोमवारी उदगीर तालुक्यात सर्वाधिक पाऊस नागलगाव मंडळात ९० मिमी इतका झाला आहे़ पाठोपाठ मोघा मंडळात ६९, नळगीर भागात ३५, उदगीर १३, वाढवणा २१, देवर्जन व हेर भागात प्रत्येकी ५ मिमी इतका पाऊस झाला आहे़(वार्ताहर)
कोल्ह्यास साधारणत: धूर्त अशी उपाधी मानवानेच दिली आहे़ परंतु, याच कोल्ह्याने मानवाला काही अंशी दिलासा दिला आहे़ मघा नक्षत्राचे वाहन कोल्हा असून, या नक्षत्राच्या अखेरीस होत असलेल्या समाधानकारक पावसाने मदतीचा हात मिळाला आहे़ तत्पूर्वीच्या मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य व अश्लेषा नक्षत्रात केवळ ३० टक्के इतकाच पाऊस झाला होता़
४मघा नक्षत्राच्या पूर्वार्धात चांगला पाऊस होइल, नंतर हुलकावण्या देईल, ओढ धरेल, असा अंदाज पंचागकर्त्यांकडून वर्तविण्यात येत होता़ परंतु, मघाचा पूर्वाधच कोरडा जाऊन उत्तरार्ध मात्र चांगल्या पावसाचा जात असल्याने वरुणराजांनी आपल्या लहरी स्वभावाद्वारे पंचागकर्त्यांचाही अंदाज चुकविला असल्याची चर्चा सुरु आहे़
गेल्या दोन दिवसांपासून जळकोट व देवणी तालुक्यातही पावसाला सुरुवात झाली आहे़ अतनूर व परिसरातही मंगळवारी पाऊस झाला़ मात्र, खरीपाचे झालेले नुकसान या पावसाने भरुन येणार नाही़ संभाव्य नुकसान मात्र टळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़