दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या, पण आता पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:06 AM2021-04-23T04:06:17+5:302021-04-23T04:06:17+5:30

-- औरंगाबाद : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. परीक्षेची नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनावर त्यांना ...

X exams were canceled, but what next? | दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या, पण आता पुढे काय?

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या, पण आता पुढे काय?

googlenewsNext

--

औरंगाबाद : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. परीक्षेची नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनावर त्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. मात्र, नववीतही परीक्षा न होता थेट दहावीत आले. आताही परीक्षा न घेण्याचा निर्णय झाल्याने थेट बारावी बोर्डाच्या परीक्षेलाच हे विद्यार्थी सामोरे जातील. विद्यार्थी परीक्षेचे टेन्शन गेल्याने काहीसे सुखावले असले तरी पालक मात्र पुढे काय शिकवावे याबद्दल धास्तावलेले आहेत.

जिल्ह्यात १०३२ शाळेत ७० हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी ६५ हजार ११ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरले. मात्र, महामारीच्या काळात आरोग्यालाही महत्त्व देणे क्रमप्राप्त असल्याने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या गेल्या. दहावी विद्यार्थ्यांचा टर्निंग पाॅईंट आहे. वर्षभर ऑनलाइन शिक्षणातून पदरी काय पडले याची कल्पना न घेता परीक्षा न घेता मूल्यमापन कसे होईल, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

गेल्या वर्षी अनेक ठिकाणी नववीच्याही सहामाहीच परीक्षा झाल्या. त्यावरच मूल्यांकन होऊन तेच विद्यार्थी थेट दहावीत आले. आता वर्षभर ऑनलाइन शिकले. काही काळ वर्ग भरले. त्यातही शंका समाधान करण्यात वेळ गेला. त्यातही निम्मे अधिक विद्यार्थी वर्गातच आले नाही. त्यामुळे दहावीतून पुढे गेल्यावर थेट बारावीच्या परीक्षेला सामोरे जातांना या विद्यार्थ्यांवर दडपण येईल, अशी भीती पालकांसह शिक्षकांतून व्यक्त होत आहे. तर परीक्षा लगेच रद्द न करता काही काळ प्रतीक्षा करणे सोयीस्कर ठरले असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

--

पालक म्हणतात.

---

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने अंतर्गत मूल्यामापन होईल. त्यावर समाधानी नसलेल्यांना गुण सुधारण्याची संधी दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मूल्यमापन कशावर आधारित आहे. हेच अद्याप कळालेले नाही. जे शिकायचे राहून गेले ते विद्यार्थ्यांना शिकवण्याची काय सोय असणार हाही प्रश्नच आहे.

-संगीता गायकवाड, पालक

---

अभ्यासक्रमाचे महत्त्व असतेच. विद्यार्थांना किती आकलन झाले. याचे मूल्यमापन परीक्षेशिवाय अशक्य वाटते. त्यामुळे दहावीच्या परीक्षा व्हायला पाहिजे होत्या. मात्र, कोरोनामुळे अडचणी आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर तरी विद्यार्थी काय शिकले काय नाही. हे समजलं तर त्यांचा कल कळू शकेल.

-संतोष अहिरे, पालक

---

मुलगी दहावीत शिकतेय. ती काय? शिकली? तिला काही येते काय? हे परीक्षेवरूनच कळले असते. परीक्षा रद्द झाली ठीक आहे. पण पुढे काय? त्यांच्या पुढील शिक्षणाचा निर्णय कसा घ्यावा. या सर्वांत मुलांचे खूप नुकसान होणार आहे. दहावी हा पाया असतो. तोच कच्चा राहिला तर पुढे काय? होईल याची चिंता वाटते.

-राधा पुसे, पालक

---

दोन वर्गांना जोडणारा ब्रीज कोर्स व्हावा

---

नववीतून थेट दहावीत आणि आता थेट अकरावीत जाणाऱ्या या बॅचबद्दल चिंता वाटते. शिक्षणात डावा आणि उजवा विद्यार्थी ठरणे गरजेचे आहे. ते परीक्षेतूनच ठरू शकते. तरी दोन वर्गांना जोडणारा दुवा म्हणून एखादा दोन-तीन महिन्यांचा ब्रीज कोर्स झाला पाहिजे. त्यातून शिकायचे राहिलेला अभ्यासक्रम विद्यार्थी शिकतील. परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर करण्याची घाई व्हायला नको होती. आता मूल्यमापन योग्य होण्यासाठी योग्य पद्धत अवलंबली पाहिजे. दहावीत परीक्षेला सामोरे न गेलेले विद्यार्थी थेट बारावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जातील, त्यावेळी त्यांच्यावर दडपण येणार नाही यासाठीही उपाययोजना आतापासून व्हायला पाहिजे.

-अनिल देशमुख, मुख्याध्यापक, गणोरी

---

६५,०११

दहावीचे विद्यार्थी

--

Web Title: X exams were canceled, but what next?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.