दहावीचा निकाल लांबणार, बोर्डाकडून शाळांनी केलेल्या चुकांची युद्धपातळीवर दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 01:52 PM2021-07-13T13:52:09+5:302021-07-13T13:54:33+5:30
SSC Result Delayed : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर शाळांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भरलेल्या निकालात चुकांचा भडिमार केला आहे.
- योगेश पायघन
औरंगाबाद : दहावीचा निकाल भरताना शाळांकडून झालेल्या चुका, राहिलेल्या त्रुटी घेऊन अजूनही शाळांची रीघ बोर्डात लागली आहे. आतापर्यंत केवळ ६० टक्के चुकांची दुरुस्ती बोर्डाकडून पूर्ण झाली असून, उर्वरित ४० टक्के त्रुटी, चुकांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. निकाल सर्वंच विद्यार्थ्यांचा एकाच वेळी लागणार असल्याचे विभागीय परीक्षा मंडळाने स्पष्ट केले असून, चुकांच्या दुरुस्तीसाठी किती वेळ लागेल याचे उत्तर अद्यापतरी नाही. मात्र, ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने निकाल आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर शाळांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भरलेल्या निकालात चुकांचा भडिमार केला आहे. त्या चुकांची दुरुस्ती करताना नाकीनव आल्याने विभागीय शिक्षण मंडळाकडून पुढे तीन दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती केली. तोही काळ संपला. अद्याप काम पूर्ण झालेले नाही. ७ जुलैपासून दुरुस्त्या सुरू असून, आतापर्यंत केवळ ६० टक्केच चुकांची दुरुस्ती होऊ शकली आहे. अजूनही शाळांकडून राहिलेल्या त्रुटींचे प्रस्ताव येणे सुरूच आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दीडशेहून अधिक शाळांतून दुरुस्तीचे प्रस्ताव आले असून, जिल्हानिहाय पाच कक्षामार्फत दुरुस्तीचे कामे सुरू असल्याचे सोमवारी दिसून आले.
इयत्ता नववी व दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे दहावीचा निकाल लागणार आहे. हा निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लागेल, असे सुरुवातीला सांगण्यात येत होते. त्यानंतर १५ जुलैपर्यंत निकाल लागेल, असे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र, शाळांनी असंख्य चुका निकाल भरताना केल्या आहेत. त्यांची दुरुस्ती आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया आणखी वेळखाऊ होऊ शकते. विभागीय शिक्षण मंडळात दहावीसाठी अर्ज केलेल्या १ लाख ७७ हजार ५७१ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ५६० विद्यार्थ्यांचा निकाल अंतिम केलेला नाही. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात ६०१ जणांच्या निकालाची निश्चिती झाली नाही, तर ९७ विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप अपूर्ण आहेत. तर रीपिटर विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनातही गुणपत्रिकांच्या त्रुटी आहेत, असे विभागीय सचिव पुन्ने यांनी सांगितले.
चुकांच्या दुरुस्तीनंतरच निकाल
शाळांनी दहावीच्या भरलेल्या निकालात असंख्य चुका आहेत. चुकांचे प्रकार वेगवेगळे आहेत. अजूनही दुरुस्तीचे प्रस्ताव शाळांकडून येतच आहेत. सर्वच विद्यार्थ्यांचा एकाच वेळी निकाल लावावे लागतील. त्यापूर्वी या दुरुस्त्या पूर्ण कराव्या लागणार आहे. त्याला किती वेळ लागले. हे सांगता येणार नाही. ६० टक्के काम झाले आहे. उर्वरित कामही सुरू आहे. राज्य मंडळाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही होईल.
-सुगता पुन्ने, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, औरंगाबाद
जिल्हा -शाळा - विद्यार्थी
औरंगाबाद -९०४-६५,०११
जालना -३९८-३१,२९६
बीड-६५२-४२,५८८
परभणी -४२५-२८,४४०
हिंगोली -२१६-१६,२७६