जिल्ह्यात २० दिवसात तिसऱ्यांदा यमराज थबकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:04 AM2021-08-18T04:04:26+5:302021-08-18T04:04:26+5:30
औरंगाबाद : औरंगाबादेतील कोरोना परिस्थितीही आटोक्यात येत असून, गेल्या २० दिवसात मंगळवारी तिसऱ्यांदा यमराज थबकला आणि जिल्ह्यात गेल्या २४ ...
औरंगाबाद : औरंगाबादेतील कोरोना परिस्थितीही आटोक्यात येत असून, गेल्या २० दिवसात मंगळवारी तिसऱ्यांदा यमराज थबकला आणि जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर, दिवसभरात शहरात ६ आणि ग्रामीण भागात ९, अशा १५ कोरोना रुग्णांची वाढ झाली.
जिल्ह्यात २३ फेब्रुवारी २०२१ रोजी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. मात्र, त्यानंतरचा दुसऱ्या लाटेतील प्रत्येक दिवस घातवार ठरत गेला. तब्बल १५६ दिवसांनंतर २९ जुलै रोजी कोरोनाच्या मृत्यूचक्राला ब्रेक लागला होता. त्यापाठोपाठ ७ ऑगस्ट रोजी जिल्ह्याने पुन्हा कोरोना मृत्यूवर विजय मिळविला. आता १० दिवसांनंतर जिल्ह्याने पुन्हा एकदा कोरोना मृत्यूवर मात केली.
जिल्ह्यात सध्या १७५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोनाची एकूण रुग्णसंख्या एक लाख ४७ हजार ७८३ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत तीन हजार ५२३ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ८ आणि ग्रामीण भागातील १७ अशा २५ रुग्णांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली.
मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद विमानतळ १, देवानगरी परिसर १, बीड बायपास परिसर १, अन्य ३
ग्रामीण भागातील रुग्ण
फुलंब्री १, गंगापूर ३, पैठण ५