‘यशवंती वाचली पाहिजे’; अंधश्रद्धा, गैरसमजुतीमुळे घोरपडीची मोठ्या प्रमाणात हत्या

By साहेबराव हिवराळे | Published: August 14, 2024 08:49 PM2024-08-14T20:49:32+5:302024-08-14T20:50:00+5:30

घोरपड संवर्धन दिन : घोरपड ही उंदीर, घूस, त्रासदायक बिटल नामक किडे, गोगलगाई यावर उपजीविका करून शेतकऱ्यांना मदत करते.

'Yashwanti Ghorapade should be safe'; Mass killing of Ghorpadi due to superstition, misunderstanding | ‘यशवंती वाचली पाहिजे’; अंधश्रद्धा, गैरसमजुतीमुळे घोरपडीची मोठ्या प्रमाणात हत्या

‘यशवंती वाचली पाहिजे’; अंधश्रद्धा, गैरसमजुतीमुळे घोरपडीची मोठ्या प्रमाणात हत्या

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासात ‘यशवंती’ घोरपड अजरामर झाली आहे. घोरपडीबद्दल शास्त्रीय माहिती दिलेली महाराजांची आज्ञा...‘यशवंती वाचली पाहिजे’ हे विशेष पोस्टर पर्यावरण संवर्धक अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. संतोष पाटील यांनी तयार केले असून, त्यावर घोरपडीची पर्यावरणातील भूमिका मांडली आहे. या वन्यजीव हत्येस आळा बसावा म्हणून जनजागृतीसाठी पोस्टर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, हॉटेल, धाबे आदी ठिकाणी लावण्यात येणार आहे.

का होते घोरपडीची हत्या?
घोरपडीचे मांस लैंगिक सामर्थ्य वाढवते, चविष्ट असते यामुळे खाण्यासाठी. भानामती, जादूटोणासाठी नख व कातडी, खंजिरी हे वाद्य बनवण्यासाठी आणि पाठदुखी बरी होते, सांडेका तेल हे आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठी घोरपडीची हत्या होते; परंतु ज्यास कुठला ही आधार नाही.

प्रबोधनाला यश...
वन्यजीवांची हत्या करणाऱ्या केदारखेडा येथील जिंदगी भोसले या फासे पारध्याचे ३ वर्षांपूर्वी प्रबोधन केल्याने त्याने शिकार करणे सोडले. त्यास आर्थिक मदत केल्यानंतर जिंदगी आता कटलरीचा फिरता व्यवसाय करतो आहे. त्याच जिंदगीच्या भावकीतील तुंबा भोसले या शिकाऱ्याचे प्रबोधन केल्याने त्यानेही घोरपड व अन्य वन्यजीवांची शिकार करणे सोडून दिले.

वनविभागाकडे सुपुर्द
या पारध्याने तंत्रमंत्रासाठी वापरली जाणारी घोरपडीची कातडी, नखे सायळची काटे, रानडुकराचे सुळे आदी वस्तू त्याने स्वतःहून आणून दिल्या. पाटील यांनी त्या वनविभागाकडे सुपुर्द केल्या.

अंधश्रद्धेचा बळी-हातजोडी
जादूटोणा करणारे हातजोडी नावाची वनस्पती धन काढण्यासाठी वापरतात. ही वनस्पती आता जवळपास नष्ट झाली आहे. त्या ऐवजी भोंदूगिरी करणारी ही मंडळी हुबेहूब हातजोडी सारखे दिसणारे घोरपडीचे अंडाशय व लिंगाची जोडी हजारो रुपयांना विकतात. त्यासाठी घोरपडीचा बळी दिला जातोय.

घोरपड अन्नसाखळीचा दुवा
घोरपड ही उंदीर, घूस, त्रासदायक बिटल नामक किडे, गोगलगाई यावर उपजीविका करून शेतकऱ्यांना मदत करते. ती मृत प्राण्यांचे मांस खाते. नैसर्गिक स्वच्छता रक्षकही आहे. ‘आफ्रिकन गोगलगाय’ ही घोरपडीचे भक्ष्य आहे. आता घोरपड नवीन कायदा १९७२ अंतर्गत शेड्युल १मध्ये संरक्षित वन्यजीव आहे.
-डॉ. संतोष पाटील, उपाध्यक्ष, पर्यावरण संवर्धक अभिनव प्रतिष्ठान

Web Title: 'Yashwanti Ghorapade should be safe'; Mass killing of Ghorpadi due to superstition, misunderstanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.