सारस्वतांसाठी यशवंतराव चव्हाण साहित्यनगरी सज्ज, उद्या उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:04 AM2021-09-24T04:04:02+5:302021-09-24T04:04:02+5:30
औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या सारस्वतांच्या स्वागतासाठी यशवंतराव चव्हाण साहित्यनगरी सज्ज झाली आहे. २५ व ...
औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या सारस्वतांच्या स्वागतासाठी यशवंतराव चव्हाण साहित्यनगरी सज्ज झाली आहे. २५ व २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संमेलनाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी दिली. या संमेलनात कोरोनासंबंधी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी शनिवारी (दि.२५) सकाळी ९.३० वाजता ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कादंबरीकार बाबू बिरादार असून, यावेळी आमदार सतीश चव्हाण, मधुकरराव मुळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या संमेलनात चार परिसंवाद होणार आहेत. यातील प्रसार माध्यमावरील परिसंवादात जयदेव डोळे अध्यक्षस्थानी असून, 'लोकमत'चे संपादक नंदकिशोर पाटील यांच्यासह संजय आवटे, अलका धूपकर, रवींद्र केसकर, वैजीनाथ अनमुलवाड सहभागी होतील. याशिवाय दोन कवी संमेलन, कथाकथन, मुलाखत, नाटक सादर होणार आहे. २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप होईल, अशी माहिती डॉ. राजेश करपे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक समितीचे मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. फुलचंद सलामपुरे, समन्वयक डॉ. रामचंद्र काळुंखे आदींनी केले आहे.