लोअर दुधना प्रकल्पात यावर्षी करणार शंभर टक्के जलसाठा
By Admin | Published: June 13, 2014 11:38 PM2014-06-13T23:38:08+5:302014-06-14T01:19:29+5:30
मोहन बोराडे, सेलू निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळयात शंभर टक्के पाणी साठा करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्पांच्या सुत्रांकडून मिळाली आहे़
मोहन बोराडे, सेलू
निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळयात शंभर टक्के पाणी साठा करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्पांच्या सुत्रांकडून मिळाली आहे़
गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे प्रकल्प निर्मिती नंतर प्रथमच 60 टक्के पाणीसाठा झाला होता़ सध्या प्रकल्पात एकुण 53 टक्के पाणी साठा असून यातील 34 टक्के जिवंत पाणी साठा आहे़ 30 वर्षा पासून रखडलेल्या निम्न दुधना प्रकल्पाचे काम दोन वर्षापुर्वी पुर्ण झाले होते मात्र प्रकल्पाच्या कालव्यांची व वितरिकांची कामे अद्यापही सुरू आहेत़ त्यामुळे प्रकल्पातील पाणी शहराच्या पाणी पुरवठयासाठी वापरण्यात आले़ गेल्या वर्षी जालना जिल्हयासह निम्न दुधना प्रकल्पाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला त्यामुळे मृतसाठयात असलेल्या प्रकल्पात 60 टक्के पाणी साठा झाला़ त्यामुळे सेलू व परतूर शहराला प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे दुधनाच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत गेली त्यामुळे प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला़ या पाणी साठयामुळे सेलू व परतूर शहराला पाणी टंचाई पासून दिलासा मिळाला यावर्षी पावसाळयात पुर्ण क्षमतेने पाणी साठा करण्याची तयारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची आहे़ जालना जिल्हयाच्या पावसावरच दुधना प्रकल्पाची पाण्याची मदार आहे़ जालना जिल्हयात चांगला पाऊस झाला तर प्रकल्पात वेगाने पाणी येते़ गतवर्षी प्रकल्पाच्या क्षेत्रात 900.40 मि़मि़ पावसाची नोंद झालेली आहे़
यावर्षीही चांगला पाऊस झाल्यास प्रकल्प तीन-चार पावसातच भरू शकतो़ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सिंचनासाठी या पाण्याचा वापर होवू शकतो़ प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम पुर्ण झाले आहे़ तर उजव्या कालव्याचे काम सुरू आहे़ यामुळे यावर्षी प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले तर ऊस व फळबागेचे क्षेत्र वाढू शकते़ त्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरण्याच्या हालचाली सुरू आहेत़ वरूण राजावर प्रकल्पाच्या पाण्याची मदार आहे़ (वार्ताहर)
मत्स्य व्यवसायाला चालना
निम्न दुधना प्रकल्पात पाणी असल्यामुळे मत्स्य व्यवसायाला चालना मिळाली आहे़ सेलू व परिसरात मोठया प्रमाणावर मत्स्य व्यवसाय सुरू आहे तसेच इतर शहरातही दुधना प्रकल्पातील माशी पाठविण्यात येत आहे़ शहरात यापुर्वी इतर ठिकाणाहून मत्स्य आणून विक्री केली जात असत परंतु, दुधना प्रकल्पातील माशानाही मागणी वाढली आहे़ दरम्यान पाण्याचा वापर शहराला, सिंचनाला झाला तर शेती व्यवसायाला चांगले दिवस येतील.