यंदा ४६ गावांत तंटामुक्ती मोहीम
By Admin | Published: May 28, 2014 12:21 AM2014-05-28T00:21:42+5:302014-05-29T00:24:17+5:30
हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून ५६५ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत ५१९ ग्रामपंचायतींनी तंटामुक्तीच्या माध्यमातून यशस्वी काम करून पुरस्कार पटकावले आहेत.
हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून ५६५ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत ५१९ ग्रामपंचायतींनी तंटामुक्तीच्या माध्यमातून यशस्वी काम करून पुरस्कार पटकावले आहेत. आता उर्वरित ४६ ग्रामपंचायतींसाठी तंटामुक्ती मोहिम राबविली जाणार असून त्यासाठीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. राज्यात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृतीअभावी या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान, प्रशासनाबरोबरच जिल्हा पोलिस दलाने नवनवीन उपक्रम हाती घेऊन लोकांना तंटामुक्तीचे महत्व पटवून दिले. त्यामुळे मागील पाच वर्षात प्रत्येकवर्षी तंटामुक्तीच्या यशाचा आलेख वाढत गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली आहेत. तर अजून जिल्ह्यातील ४६ गावे या पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. या गावांना तंटामुक्त करण्यासाठी समित्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील १२ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५१९ गावे तंटामुक्ती मोहिमेमध्ये पुरस्कारास पात्र ठरली. हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीतील ४९ पैकी ३९ गावे तंटामुक्त झाली असून १० गावे शिल्लक आहेत. बासंबा ठाणे हद्दीतील ४९ पैकी ४० गावे तंटामुक्त ठरली असून ९ गावे बाकी आहेत. नर्सी नामदेव ठाणे हद्दीतील २० पैकी १६ गावे, गोरेगाव ठाणे हद्दीतील ३७ पैकी ३२ गावे, सेनगाव ठाणे हद्दीतील ५९ पैकी ४८ गावे, कळमनुरी ठाणे हद्दीतील ६८ पैकी ६४ गावे, आखाडा बाळापूर ठाणे हद्दीतील ७६ पैकी ७६ गावे तंटामुक्त झाली आहेत. औंढा नागनाथ ठाणे हद्दीतील ५७ पैकी ५६ गावे, हट्टा ठाणे हद्दीतील५६ पैकी ५५ गावे, कुरूंदा ठाणे हद्दीतील ५४ पैकी ५४ गावे तंटामुक्त झाली आहेत. वसमत ठाणे हद्दीतील ४० पैकी ३९ गावे तंटामुक्तीच्या पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. पुरस्कारासाठी शिल्लक राहिलेल्या ४६ ग्रामपंचायतींमध्ये सेनगाव ठाणे हद्दीतील ११ व हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीतील १० गावांचा समावेश आहे, अशी माहिती तंटामुक्ती समितीचे जिल्हा समन्वयक जमादार निजाम शेख यांनी दिली. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४६ गावांमध्ये तंटामुक्ती समित्यांची निवड करून मोहिमेच्या कामाला सुरूवात करण्यात आली. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमुळे आलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार जिल्ह्यात या मोहिमेचे काम सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ३१ आॅगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)राज्यात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृती न झाल्याने या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. हळूहळू वाढत गेला लोकसहभाग.जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली आहेत तर अजून जिल्ह्यातील ४६ गावे या पुरस्काराच्या प्रतिक्षेत आहेत. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४६ गावांमध्ये तंटामुक्ती समित्यांची निवड करून मोहिमेच्या कामाला सुरूवात करण्यात आली. शिल्लक राहिलेल्या ४६ ग्रामपंचायतींमध्ये सेनगाव ठाणे हद्दीतील ११ व हिंगोली ग्रामीण हद्दीतील १० गावे आहेत.