औरंगाबाद जिल्ह्यात यंदा कपाशी क्षेत्र घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:26 AM2018-05-22T00:26:54+5:302018-05-22T00:28:06+5:30
कमी व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. अशातच अलीकडे कपाशीवरील बोंडअळीने शेतक-यांचे अर्थकारणच बिघडून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कमी व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. अशातच अलीकडे कपाशीवरील बोंडअळीने शेतक-यांचे अर्थकारणच बिघडून गेले. याच्या धाकापोटी यंदा कपाशीच्या लागवड क्षेत्रात सुमारे ३० हजार हेक्टरची घट अपेक्षित असल्याचे मत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी व्यक्त केले.
कायम दुष्काळी म्हणून औरंगाबाद जिल्हा ओळखला जातो. तरीही हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा चांगल्या पावसाचे संकेत असल्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. जिल्ह्यात यंदा ७ लाख २० हजार हेक्टर एवढे खरीप हंगामाचे लागवडीचे सरासरी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. खरीप हंगामात यंदा पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या ४८ हजार ९६४ क्विंटल बियाणांची आवश्यकता असून, त्यादृष्टीने जि.प. कृषी विभागाने पूर्वतयारी केली आहे. बियाणांची कमतरता भासणार नाही, असेही कृषी विकास अधिकारी गंजेवार यांनी सांगितले.
गेल्या वर्षी जिल्ह्यात ६ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपामध्ये पेरणी झाली होती. यंदा ७ लाख २० हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक आहे. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकºयांचे कंबरडे मोडले. हाती आलेले पीक बोंडअळीने फस्त केल्यामुळे शेतकºयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली, असे असले तरी अनियमित पावसामुळे शेतकºयांसमोर या नगदी पिकाशिवाय दुसरा पर्याय नाही. जिल्ह्यात कापसाचे ४ लाख ३८ हजार हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र असले तरी गेल्या वर्षी जिल्ह्यात ४ लाख ७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड अपेक्षित आहे.
खते व बियाणे कमी पडणार नाहीत
कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार म्हणाले की, खरीप हंगामात खते व बियाणांची कमतरता भासणार नाही. मात्र, मागील वर्षी कापसाच्या पिकावर झालेला शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकºयांनी पाऊस पडल्याशिवाय पूर्वहंगामी कापसाची लागवड टाळावी. कपाशीनंतर जिल्ह्यात मका पिकाला प्राधान्य दिले जाते. गेल्या वर्षी १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेण्यात आले. यंदा १ लाख ९० हजार हेक्टरवर मक्याची लागवड अपेक्षित आहे. यासाठी २९ हजार क्विंटल बियाणांची गरज असून कपाशीच्या बियाणांची १८ लाख ८६ हजार पाकिटे लागतील.