यंदा एकाही पदाची भरती अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:55 PM2018-02-13T23:55:48+5:302018-02-13T23:56:02+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १ फेब्रुवारी रोजी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्य:स्थिती जाहीर केली आहे. यात २०१८ या वर्षात ‘एमपीएससी’तर्फे भरण्यात येणाºया जागांसाठी राज्य सरकारने मागणीपत्रच दिलेले नाही. यामुळे यंदा महत्त्वाच्या पदांच्या जागा निघणे अवघड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राम शिनगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १ फेब्रुवारी रोजी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्य:स्थिती जाहीर केली आहे. यात २०१८ या वर्षात ‘एमपीएससी’तर्फे भरण्यात येणाºया जागांसाठी राज्य सरकारने मागणीपत्रच दिलेले नाही. यामुळे यंदा महत्त्वाच्या पदांच्या जागा निघणे अवघड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य सरकारने पदभरतीची मागणी केल्यानंतरच ‘एमपीएससी’तर्फे जागा भरतीची प्रक्रिया राबविली जाते. ही प्रक्रिया साधारणपणे १७ ते १८ महिन्यांपर्यंत चालते. यातच न्यायालयात काही प्रश्न उपस्थित झाले, तर याला आणखी उशीर होतो. यामुळे विविध पदांच्या वर्षातून दोन वेळा जागा निघणे अपेक्षित असते. मात्र, सरकारने पदभरतीवर घातलेल्या बंदीचा फटका ‘एमपीएससी’तर्फे भरण्यात येणाºया पदांनाही बसला आहे. आगामी आर्थिक वर्षात जरी भरतीवरील बंदी उठवली तरी ‘एमपीएससी’तर्फे होणाºया पदभरतींना मूर्तस्वरूप २०१९ मध्येच येणार आहे. यातही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या जाहीर झाल्यास अचारसंहितेमुळे जागांची भरती काढता येणार नाही. राज्य सरकारने मागणी केल्यानुसार ‘एमपीएससी’तर्फे २९ डिसेंबर २०१७ रोजी राज्यसेवा परीक्षांची जाहिरात दिली आहे. यात केवळ ६९ जागांचा समावेश आहे. यासाठी ८ एप्रिलला पूर्वपरीक्षा आणि १८, १९ व २० आॅगस्ट रोजी मुख्य परीक्षा घेण्याचे वेळापत्रकानुसार प्रस्तावित आहे. यात मुख्य परीक्षा झाल्यानंतर निकाल लावून मुलाखती आणि अंतिम निकालासाठी २०१९ हे सालच उजाडणार आहे. याचा फटकाही परीक्षांची तयारी करणाºया युवकांना बसत आहे. तसेच राज्य सरकारने पीएसआय, एसटीआय, एएसओ, अभियांत्रिकी, मोटार वाहन निरीक्षक, कृषिसेवा पदांसाठी चालू वर्षात मागणी नोंदविली नसल्यामुळे परीक्षा कधी होणार याविषयी अद्यापही निश्चित असे काहीच ठरलेले नाही.
या परीक्षांचे निकाल पेंडिंग
‘एमपीएससी’तर्फे ७ डिसेंबर २०१६ रोजी पीएसआयसाठी जाहिरात देण्यात आली. यापरीक्षेच्या पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखती झाल्या आहेत. मात्र, अद्यापही अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. राज्यसेवेसाठी १४ डिसेंबर २०१६ रोजी जाहिरात दिली. याची केवळ पूर्व, मुख्य परीक्षा घेतली. मुख्य परीक्षेचा अद्यापही निकाल लागला नाही. विभागांतर्गत पीएसआयची जाहिरात १४ जून २०१७ रोजी दिली. हीसुद्धा पेंडिंगच आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षकपदासाठी ३० जानेवारी २०१७ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. यात मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर नाही. लिपिक, टंकलेखकसाठी ६ एप्रिल २०१७ रोजी जाहिरात आली. यात मुख्य परीक्षेचा निकाल पेंडिंग. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदासाठी १५ मार्च २०१७ रोजी जाहिरातीमधील मुलाखती बाकी. महाराष्ट्र वनसेवा परीक्षेची जाहिरात ६ एप्रिल २०१७ रोजी आली. यात अंतिम निकाल बाकी आहे. याशिवाय इतरही अनेक परीक्षांचे २०१६ पासून भिजत घोंगडे तसेच पडलेले आहे. अनेक परीक्षांची प्रक्रिया अर्ध्यावरच आहे. याचे परिणाम बेरोजगार युवकांना भोगावे लागत आहेत.
तामिळनाडू पॅटर्न लागू करण्याची मागणी
तामिळनाडू राज्यात लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येते. यात पदांची जाहिरात देतानाच पूर्वपरीक्षा, तिचा निकाल, मुख्य परीक्षा, त्या परीक्षेचा निकाल आणि अंतिम निकाल यांचे वेळापत्रक परीक्षेपूर्वी जाहीर केले जाते. अंतिम निकालानंतर निवड झालेल्यांना सेवेत दाखल करण्याचा दिनांकही जाहीर करण्यात येतो.
तामिळनाडू राज्यात स्पर्धा परीक्षांसंदर्भात सर्व गोष्टी अगोदरच स्पष्ट असल्यामुळे कोणत्याही अडचणी निर्माण होत नाहीत. युवकांना निश्चित वेळेत अभ्यास करता येतो. हाच पॅटर्न महाराष्ट्रातही लागू झाला पाहिजे, अशी युवकांची मागणी आहे. याउलट महाराष्ट्रात जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर परीक्षेची प्रक्रिया आणि अंतिम निकालास १६ ते १७ महिने लागतात. यानंतर यशस्वी उमेदवारांना प्रत्यक्षात सेवेत रुजू होण्यास तब्बल एक ते दोन वर्षे लागतात. हा मुख्य फरक दोन्ही राज्यांतील लोकसेवा आयोगात आहे.
उद्याच्या अंकात
मागील चार वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरलेल्या जागा आणि राज्यातील सर्व विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या.