सिल्लोड तालुक्यात यंदा मिरचीची विक्रमी लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:53 AM2018-04-30T00:53:34+5:302018-04-30T00:54:16+5:30
कापसाचे क्षेत्र घटणार : गतवर्षी भाव स्थिर राहिल्याने कल वाढला
श्यामकुमार पुरे
सिल्लोड : गतवर्षी मिरचीचे भाव स्थिर राहिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला नफा झाला, यामुळे यंदा तालुक्यात उन्हाळी मिरचीची लागवड वाढली असून मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी दुप्पट म्हणजे जवळपास अडीच हजार हेक्टर क्षेत्रात मिरचीची लागवड होईल, असा अंदाज व्यापारी, नर्सरीचालक व शेतकºयांनी व्यक्त केला. परिणामी, कापसाचे क्षेत्र कमालीचे घटणार आहे.
२०१७ मध्ये तालुक्यात १ हजार ३८२ हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत २०१६ मध्ये केवळ १७४ हेक्टर, २०१५ मध्ये २४६ हेक्टर, तर २०१४ मध्ये केवळ ५० हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत यावर्षी विक्रमी म्हणजे अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मिरचीची लागवड होताना दिसत आहे.
सुरुवातीला चांगला भाव मिळावा म्हणून पानवडोद शिवार व सिल्लोड तालुक्यात काही शेतकºयांनी २५ मार्चपासून मिरची लागवड केली आहे; पण वातावरण ‘सूट’ न झाल्याने काही शेतकºयांच्या रोपांवर रोग पडला आहे. यामुळे २५ टक्के रोपे नष्ट होताना दिसत आहेत. ५ एप्रिलपासून मिरची लागवडीचा वेग वाढला आहे. सुरुवातीला भाव मिळविण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत.
पाच नर्सरीमधून ८० लाख रोपांची विक्री
तालुक्यात शिवना येथे २, जळकी येथे २, पानवडोद येथे १ अशा पाच मिरची रोपांच्या नर्सरीमधून एप्रिलअखेर ८० लाख मिरची रोपांची विक्री झाली असून अजून बुकिंग सुरू आहे. याशिवाय फर्दापूर, हिंगणा, खान्देश, विदर्भ, मराठवाड्यातून लागवडीसाठी शेतकरी रोपांची बुकिंग करीत आहेत. माझ्या शिवना येथील नर्सरीमधूनच ८ लाख ५० हजार रोपांची विक्री झाली आहे. अजूनही मागणी सुरूच आहे, असे नर्सरीचालक संजय काळे यांनी सांगितले.
शेततळ्यांचा होणार फायदा
काही शेतकºयांनी रबी पिके न पेरता मिरचीसाठी विहिरीत पाणी साठवून ठेवले आहे. तर बहुतेक शेतकºयांनी नियोजन करून मागील दोन वर्षांत शेततळी केली आहेत. ज्या शेतकºयांकडे पाणी आहे ते मिरची लागवड करीत आहेत, तर काही शेतकरी टँकरने विहिरीत पाणी टाकून मिरची लागवड करीत आहेत.
अर्धा एकरमध्ये तीन लाख निव्वळ नफा
मागील वर्षी मी २० गुंठे जमिनीत ४ हजार रोपे लावली होती. भाव स्थिर राहिल्याने अखेरपर्यंत खर्च वजा जाता ३ लाख रुपये निव्वळ नफा झाला, असे अनाड येथील शेतकरी हरिभाऊ रामचंद्र पवार यांनी सांगितले.
दरम्यान, गतवर्षी अनेक संकटे आल्याने यंदा कापसाचे क्षेत्र घटणार असून सध्या मिरची लागवड सुरू असली तरी २५ टक्के मिरचीवर रोग पडत असल्याने शिवना येथील शेतकरी चंदन गुप्ता यांनी सांगितले.
मिरची लागवडीवर होणारा खर्च
सध्या ‘मल्चिंग’वर मिरची लागवड करण्याकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. १ एकरसाठी मल्चिंग २० हजार रुपये, ठिबक २० हजार, रोप खर्च ८ हजार रुपये, १० हजार रुपये खत असा खर्च येत आहे. असा ५५ ते ६० हजार रुपये खर्च येत आहे.