यंदा सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:02 AM2021-06-01T04:02:51+5:302021-06-01T04:02:51+5:30

औरंगाबाद : कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली; पण निकालाचे काय, असा सवाल असताना तोही तिढा शुक्रवारी सुटला. दहावीच्या निकालाचे ...

This year the result of all the schools is one hundred percent | यंदा सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

यंदा सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली; पण निकालाचे काय, असा सवाल असताना तोही तिढा शुक्रवारी सुटला. दहावीच्या निकालाचे सूत्र जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण आहे. नववीत तर पास आहोतच, दहावीचे अंतर्गत मूल्यांकन, गुणांकन स्थानिक शाळांचे शिक्षकच करणार असल्याने आता शाळांचे निकालही शंभर टक्के लागणार आहेत.

शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालकांसह विविध घटकांशी २४ बैठका घेत दहावीची मूल्यांकन पद्धत तयार झाली. तो मध्यम मार्ग असल्याचे तज्ज्ञ शिक्षकांचे मत आहे, तर कोरोनाच्या परिस्थितीत तोच योग्य मार्ग असल्याचेही अनेक शिक्षकांनी म्हटले आहे. नववीतील विद्यार्थ्यांचे गेल्या वर्षीचे वस्तुनिष्ठ पद्धतीने झालेले गुणांकन सरल प्रणालीवर आहे. त्याचा आधार यंदाच्या दहावीच्या परीक्षेत घेतला जाणार आहे. आता केवळ दहावीच्या मूल्यांकनाचा प्रश्न आहे. जिथे वर्ग चांगले भरले तिथल्या मूल्यांकनात अडचणी नाहीत. मात्र, जिथे वर्गच भरले नाहीत, शिकविलेच गेले नाही. तिथे मात्र मूल्यांकनाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दहावीचे एकूण विद्यार्थी -७३,२७९

मुले -३९,६३९

मुली -३३,६४०

---

असे असेल नवे सूत्र

नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के वापरून दहावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल. दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला ३० गुण, तर गृहपाठ तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे २० गुण दिले जातील.

---

शिक्षणतज्ज्ञ म्हणतात....

मूल्यमापनात नववीच्या गुणांना ५० टक्के भारांश आहे. उर्वरित पन्नास गुणांत ३० टक्के दहावीच्या लेखी, तर २० टक्के तोंडी परीक्षेला महत्त्व दिले आहे. त्यामुळे निकाल अन् विद्यार्थ्यांसाठी सोयीचे आहे.

-डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी

--

अंतर्गत मूल्यमापनासोबत उर्वरित २० गुणांसाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना मिळाल्या पाहिजेत. तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिके, गृहपाठ लेखनकार्य यासाठी विद्यार्थ्यांना कसे बोलवावे तेही स्पष्ट झाले तर मूल्यांकन आणि गुणदानात अडचणी राहणार नाहीत.

-अनिल देशमुख, मुख्याध्यापक,

--

चाचण्या, सराव घेतले. गुणांकन हे त्यावर होणार आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ऑनलाइन शिक्षण यापुढेही कोरोनामुळे काही काळ असेल. त्यावेळी विद्यार्थी गंभीरतेने शिकतील. हाही या निर्णयाचा फायदा आहे.

-दीपाली जाधव, शिक्षिका

---

पालक म्हणतात....

नववीत परीक्षा झाली नाही. आता दहावीची परीक्षा झाली नाही. त्यामुळे मुलगा काय शिकला, त्याचे किती आकलन झाले, त्याला पुढे कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायला लावायचा, याबद्दल अनेक शंका आहेत. त्यामुळे कलचाचणी तरी व्हायला हवी होती.

-समाधान जाधव, पालक

---

मुलगी दहावीत परीक्षा न देता पास होतेय हे वरवर आनंदी वाटत असले तरी पुढच्या शिक्षणात त्याचा अडसर येणार याची चिंता आहे. आता अकरावी, बारावीची तयारी व्यवस्थित झाली तर पाया भक्कम होईल. शिवाय कोरोनाच्या संक्रमणाचेही टेन्शन आहेच.

-अपूर्वा पाठक, पालक

---

विद्यार्थी खुश

नववीची वार्षिक परीक्षाच झाली नाही, त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाने लागलेला निकाल विद्यार्थ्यांना सुखावणारा होता, तर त्याच आधारे, तसेच यावर्षीच्या अंतर्गत मूल्यमापनावरून गुण ठरणार असल्याने विद्यार्थ्यांत खुशीचे वातावरण आहे. परीक्षा रद्द झाल्याने शंभर टक्के पास होणार असून, अकरावीच्या आधीच अनेक जागा रिक्त राहतात. सीईटी न देता अकरावीत प्रवेश मिळेल असा विश्वास दहावीचा विद्यार्थी प्रथमेश सोनवणे याने व्यक्त केला.

--

पुढील प्रवेशाचे काय होणार?

दहावीनंतर अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात एकच सीईटी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान, ही सीईटी पूर्णपणे ऐच्छिक असून दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. १०० गुणांची सीईटी दोन तासांची असेल, असे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे, तर आयटीआय आणि तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्राच्या प्रवेशाबद्दल निश्चित सूचना मिळाल्या नसून पालकांकडून मात्र आयटीआट पाॅलिटेक्निकसाठी विचारणा सुरू झाली आहे.

Web Title: This year the result of all the schools is one hundred percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.