यंदा नांदेडमध्ये होणार राज्यस्तरीय योग दिन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 02:31 PM2019-06-14T14:31:27+5:302019-06-14T14:32:58+5:30
देशातील विविध भागातून योग शिबिरासाठी नागरिक उपस्थित राहणार आहेत़
नांदेड- आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त नांदेड येथे राज्यस्तरीय योग दिन सोहळा २१ जून रोजी साजरा करण्यात येणार असून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री, प्रधान सचिव यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली़
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी नांदेडमध्ये आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार असून योगसत्राचे संचालन स्वामी रामदेव बाबा हे करणार आहेत़ स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार आहे़ अंदाजे १ लाख लोकांना एकाच वेळी योगासने करता येतील, अशी व्यवस्था असर्जन येथील ३२ एकर शासकीय जमिनीवर करण्यात येणार आहे़ या कार्यक्रमासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले असून जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे़ या समितीची बैठकही घेण्यात आली़
या योग शिबिरात नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालयातील इयत्ता ९ वी ते ११ वी व पदव्युत्तर विद्यार्थी तसेच वैद्यकीय महाविद्यालय, दंत विद्यालय, एनसीसी, एनएसएस मधील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासाठी प्रशासनामार्फत निर्देश दिले आहेत़ योग साधनेसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ देशातील विविध भागातून योग शिबिरासाठी नागरिक उपस्थित राहणार आहेत़
१२, १३ व १४ जून या तीन दिवसामध्ये शासकीय, खाजगी शाळा, कॉलेज येथील पीटी शिक्षकांसह प्रश्क्षिण ए़ के़ संभाजी मंगल कार्यालय, येथे सकाळी ६ ते ८ या कालावधीत देण्यात येत आहे़ १७ जून पासून शाळा, महाविद्यालय सुरू होणार असून १७, १८ व १९ जून या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी सकाळी ७ ते ८ या वेळेत त्या त्या शाळा, महाविद्यालयात प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ या शिबिरामध्ये ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व इतर कर्मचारी तसेच तालुक्यातील इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनाही १३ ते १५ जून या दिवशी योग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे़ त्यांच्या मार्फत गावपातळीवर १७ ते १९ जून या दरम्यान योग विषयक प्रशिक्षण देण्यात येणार आहे़
जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेड येथे २१ जून रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी़आरक़ुंडगीर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़ या कक्षामध्ये ३१ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत़ याबरोबरच कार्यक्रम ठिकाण असलेल्या योगभूमी, मामा चौक, असर्जन, कौठा येथील व्यवस्थापन व सनियंत्रणावर हा कक्ष देखरेख ठेवणार आहे़