यंदाही होळी सणावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:04 AM2021-03-26T04:04:22+5:302021-03-26T04:04:22+5:30
घाटनांद्रा : लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वात आवडीचा सण म्हणजेच होळी व रंगपंचमीचा होय. हा सण अवघ्या दोन दिवसांवर आला असून ...
घाटनांद्रा : लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वात आवडीचा सण म्हणजेच होळी व रंगपंचमीचा होय. हा सण अवघ्या दोन दिवसांवर आला असून कोरोना संसर्गामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही या सणावर कोरोनाचे सावट पसरले आहे. परिणामी यंदाही बालगोपाळांमध्ये निरुत्साहाचे वातावरण पसरले आहे.
बालगोपाळांसह सर्वचजण धुलिवंदन अर्थात रंगपंचमीची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र गेल्यावर्षीपासून आपल्या देशात ओढवलेले कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. त्यामुळे रंगपंचमी सणाच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे. ग्रामीण भागात खेडोपाडी होळीच्या सणाच्या चाकोल्या बनविणे सुरू आहे. पारंपरिक रिती-रिवाजाप्रमाणे घरोघरी होळी पेटवली जाईल. परंतु होळी सण झाल्यावर दुसऱ्या दिवशी असते रंगपंचमी. मात्र, कोरोनामुळे शासनाकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे रंग खेळायचा की नाही, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. मात्र, यंदाही बच्चेकंपनीच्या या आवडीच्या सणावर संकट आल्याने सर्वत्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.