यंदाही अकरावीसाठी केंद्रीय पद्धतीनेच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:01 PM2020-07-03T17:01:19+5:302020-07-03T17:04:49+5:30
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर १ ते १५ जुलैपर्यंत महाविद्यालयांना नोंदणी करण्याची मुदत
औरंगाबाद : यंदाही महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी केंद्रीय पद्धतीनेच आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, १ जुलैपासून महाविद्यालयांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेचे यंदाचे चौथे वर्षे असून, महाविद्यालयांमध्ये कोणत्या शाखा, शाखानिहाय विद्यार्थी संख्या, अनुदानित- विनाअनुदानित प्रवेश क्षमता आदींबाबतची संकेतस्थळावर माहिती अपलोड केली जात आहे, असे शिक्षण सहायक संचालक एम.के. देशमुख यांनी सांगितले.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर १ ते १५ जुलैपर्यंत महाविद्यालयांना नोंदणी करण्याची मुदत असून, १६ जुलैपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रवेश क्षमता निश्चित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दोन भागांत संकेतस्थळावरच नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. महाविद्यालयांच्या नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना पहिल्या भागाची नोंदणी १५ जुलैपासून दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत करता येणार आहे.
पहिल्या भागात विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती, दहावी परीक्षेचा बैठक क्रमांक नोंदणी करावा लागतो, तर निकाल जाहीर झाल्यानंतर मिळालेले गुण, कोणत्या शाखेसाठी व कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, तो पसंती क्रमांक नोंद करावा लागेल. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रवेश प्रक्रियेबाबत जोरदार तयारी सुरू केली असून, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांसह विविध कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांना पत्र पाठवून पूर्वतयारीसाठी सूचना दिल्या आहेत.
मागील वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान, आॅनलाईन प्रवेशाच्या गोंधळामुळे ती सप्टेंबर- आॅक्टोबरपर्यंत चालली. गेल्या वर्षी ८ हजार ८१४ जागा रिक्त राहिल्या. विद्यार्थ्यांनी सततच्या प्रवेश फेऱ्यांना कंटाळून शेवटी ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले. औरंगाबाद शहरात विद्यार्थ्यांच्या उपलब्ध जागा अधिक आणि विद्यार्थी कमी असल्यामुळे हजारो जागा रिक्त राहतात. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थी, पालकांसह संस्थाचालक करीत आहेत.
तीन वर्षांपासून हजारो प्रवेश रिक्त
सन प्रवेश क्षमता नोंदणी झालेले प्रवेश रिक्त जागा
२०१७-१८ २६,४२५ २३,०४८ १६,७१९ ९,७०६
२०१८-१९ २६,४०५ २५,३८७ १७,५१७ ८,८८८
२०१९-२० २५,४७७ २१,६०२ १६,६६३ ८,८१४