वर्ष उलटले, पण कोरोना याेद्धांचा रुग्णांसाठी न थकता अहोरात्र लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:05 AM2021-03-28T04:05:32+5:302021-03-28T04:05:32+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : ‘तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुडेगा कभी, कर शपथ, कर ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
‘तू न थकेगा कभी,
तू न रुकेगा कभी,
तू न मुडेगा कभी,
कर शपथ, कर शपथ, कर शपथ,
अग्नीपथ अग्नीपथ अग्नीपथ.....
हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या या ओळी कोरोना योद्धे डाॅक्टर, परिचारिका, चतुर्थश्रेणी आणि प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अगदी खऱ्या ठरत आहे. वर्ष उलटले, पण कोरोनाविरुद्ध हे योद्धे न थकता दिवसरात्र लढत आहे. हा लढा देताना अनेक जण स्वत: बाधित झाले, पण त्यातून सावरून पुन्हा रुग्णसेवेत दाखल झाले.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन १५ मार्च रोजी वर्ष झाले. पण कोरोनाचे आव्हान संपलेले नाही, तर पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक वाढले. कोरोना व्हायरसच्या भयामुळे साध्या शिंकणाऱ्या व्यक्तीपासून बहुतांश जण दूर पळतात, पण त्याच वेळी पाॅझिटिव्ह रुग्णांवर डाॅक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी कोणतीही भीती न बाळगता निष्ठेने गेल्या वर्षभरापासून उपचार करीत आहे. घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, ईएसआयएस हाॅस्पिटल, महापालिकेची कोविड केअर केंद्रे, मेल्ट्राॅन आणि खासगी रुग्णालयांतील आरोग्य कर्मचारी खबरदारीसह सकारात्मक राहून रुग्णसेवा देत आहे. त्यांच्या या सेवेप्रति कोरोनातून बरा होऊन जाणारा प्रत्येक रुग्ण कृतज्ञता व्यक्त करीत आहे.
लहान बाळ, आजार, तरीही पुढे...
कुणाचे लहान बाळ आहे, तर कुणाच्या घरी वयोवृद्ध आई-वडील आहेत. तर कोणाला सहव्याधी आहेत. तरीही रुग्णसेवा देण्यात आरोग्य कर्मचारी पुढेच पाऊल टाकत आहे.
रुग्णसंख्या वाढली आहे. त्यातुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही. त्यामुळे कामाचा भार कितीतरी वाढला आहे. कर्तव्याची कोणतीही ठरावीक वेळ न पाळता दिवसरात्र रुग्णांना सेवा देण्यात आरोग्य कर्मचारी व्यस्त आहेत.
-------
पूर्वीपेक्षा आव्हान वाढले
कोरोनासाठी गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहे. ही सेवा देताना मी स्वत: कोरोनाबाधित झालो, पण बरे होताच पुन्हा रुग्णसेवेत रुजू झालो. कोरोनाचे आव्हान पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. अशात आम्ही सेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे.
-डाॅ. पराग अंभाेरे
--
जास्तीत जास्त सेवा घडावी
सतत कार्यरत आहोत, जास्तीत जास्त रुग्णांना सेवा आमच्या हातून घडावी, हाच प्राधान्यक्रम आहे. माझे बाळ सहा महिन्यांचे असताना ही कोरोनाच्या कर्तव्यावर रुजू झाले होते. इतरांना कोरोनामुक्त करण्यात आपले योगदान राहील, हे अधिक महत्त्वाचे वाटते.
- सुकन्या अवचरे, स्टाफ नर्स
-----
फोटो ओळ..
आरोग्य कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करून कोविड केंद्रातून रवाना होणारा कोरोनामुक्त रुग्ण.