जायकवाडी तुडुंब असल्याने यावर्षी पूर्ण क्षमतेने आवर्तने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:17 PM2020-01-24T18:17:13+5:302020-01-24T18:18:58+5:30
धरणावर अवलंबून असलेल्यांना पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलै २०२० अखेरपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन आहे.
औरंगाबाद : यंदा जायकवाडी धरण तुडुंब भरले आहे. त्यामुळे जायकवाडीतून उन्हाळी हंगामात पूर्ण क्षमतेने आवर्तन देण्याचे सूतोवाच गुरुवारी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
गुरुवारी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानबाद, लातूर जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पाच्या पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. याबाबत माहिती देताना टोपे म्हणाले, जायकवाडीत १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. धरणावर अवलंबून असलेल्यांना पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलै २०२० अखेरपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन आहे. रबी हंगातील एक आवर्तन झालेले आहे, तर एक आवर्तन आताच सोडण्यात आलेले आहे. उन्हाळी हंगामात मार्च ते जून या कालावधीत ४ पाणीपाळी देण्यात येणार आहेत. नांदूर मधमेश्वरमधून रबी हंगामात एक, तर उन्हाळी हंगामात २ आवर्तने दिली जाणार आहेत. निम्म दुधनात १३.३८ टक्केच पाणी असल्याने रबीसाठी एक अवर्तन देण्यात येणार आहे. माजलगाव प्रकल्पातून रबीसाठी २ व उन्हाळ्यात ४ आवर्तने दिली जातील. निम्म तेरणातून केवळ रबीसाठी ३ आवर्तने निश्चित केली आहे. मांजराचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे.
२०४१ मध्ये हक्काच्या पाण्यावर गदा
बैठकीत आ. अंबादास दानवे आणि प्रशांत बंब यांनी नांदूर-मधमेश्वर प्रकल्पात आरक्षण वाढविण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे आरक्षण वाढत गेले, तर २०४१ पर्यंत हक्काचे पाणी मिळणार नाही. त्या-त्या काळात दिल्या गेलेल्या आरक्षणाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत शासनस्तरावर पुनर्विचार करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
७० टक्के जागा रिक्त
जलसंपदा विभागात ७० टक्के कर्मचाऱ्यांचा जागा रिक्त आहेत. कालवा निरीक्षक, कनिष्ठ अभियंते, अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण येतो. त्यामुळे निवृत्त कर्मचारी, कं त्राटी पद्धतीने घेण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे टोपे म्हणाले.