मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; तज्ज्ञ म्हणतात, मान्सूनचा पॅटर्न बदलला

By विकास राऊत | Published: November 29, 2023 12:17 PM2023-11-29T12:17:56+5:302023-11-29T12:22:35+5:30

''फेब्रुवारी-मार्चमध्ये पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर पुढे दुष्काळाला सामाेरे जावे लागेल.''

Yellow alert for rain in Marathwada; Experts say, the monsoon pattern has changed | मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; तज्ज्ञ म्हणतात, मान्सूनचा पॅटर्न बदलला

मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; तज्ज्ञ म्हणतात, मान्सूनचा पॅटर्न बदलला

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये २९ व ३० नोव्हेंबर रोजी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. तर मंगळवार २८ रोजी सात जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ असल्यामुळे विभागात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याच्या भाकितानुसार दोन दिवस मराठवाड्यात पाऊस बरसणार आहे. तर तज्ज्ञ मान्सूनचा पॅटर्न बदलला असल्याचे सांगत आहेत.

मागील दोन दिवसांत मराठवाड्यात ४८.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मंगळवार सकाळपर्यंत ७ मि.मी. पाऊस झाला. तर रविवार रात्रीपासून सोमवार पहाटेपर्यंत ४१.५ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मागीलवर्षी आजच्या तारखेपर्यंत ९११ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. सरत्या पावसाळ्यात मराठवाड्यातील आठपैकी नांदेड व हिंगोली जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस झाला. उर्वरित जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांच्या आसपास पावसाची तूट राहिली.

दोन दिवसांत जिल्हानिहाय झालेला पाऊस .....
जिल्हा..................................पाऊस मि.मी.मध्ये

छत्रपती संभाजीनगर................७५.१ मि.मी.
जालना...............................८२.९ मि.मी
बीड..................................३३.०० मि.मी
लातूर................................५.३ मि.मी.
धाराशिव..............................१५.२ मि.मी.
नांदेड..............................३८.१ मि.मी.
परभणी.............................६९.१ मि.मी.
हिंगोली..............................७८.८ मि.मी.

एकूण.................................४८.५ मि.मी.

मार्च-फेब्रुवारीत पावसाची शक्यता
उत्तरेकडून पश्चिमेकडे वाऱ्यासह बाष्प वाहत आहे. त्यात अरबी समुद्रातील बाष्प मिसळले जात आहे. दुपारी ३.३० वाजेपासून तापमान घटते आहे. त्यामुळे रात्रीतून गारपिटीसह पाऊस होतो आहे. एक-दोन दिवस ढगाळ वातावरण राहील. मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर पुढे दुष्काळाला सामाेरे जावे लागेल.
-प्रा. किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ

Web Title: Yellow alert for rain in Marathwada; Experts say, the monsoon pattern has changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.