'होय मी उभं राहणारच', दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांचा चंद्रकांत खैरेंविरुद्ध निर्धार

By राजा माने | Published: March 18, 2019 09:20 PM2019-03-18T21:20:55+5:302019-03-18T21:31:40+5:30

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभेसाठी मैदानात उतरणार असल्याचा निर्धार लोकमतशी बोलताना स्पष्ट केला.

'Yes, I will stand up', Demonstrate against Harsh Vardhan Jadhav's Chandrakant Khaire | 'होय मी उभं राहणारच', दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांचा चंद्रकांत खैरेंविरुद्ध निर्धार

'होय मी उभं राहणारच', दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांचा चंद्रकांत खैरेंविरुद्ध निर्धार

googlenewsNext

औरंगाबाद - भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्धार केला आहे. होय, मी उभं राहणारच, असे म्हणत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे, याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी माझी बोलणी झाल्याचेही जाधव यांनी सांगितले. 

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभेसाठी मैदानात उतरणार असल्याचा निर्धार लोकमतशी बोलताना स्पष्ट केला. विशेष म्हणजे, काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. सत्तारजींनी मला काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासंदर्भात विचारणा केली, त्यामुळे मी निर्धार पक्का केला आहे, असे सांगत युतीच्या उमेदवाराविरुद्ध हर्षवर्धन जाधव यांनी रणशिंग फुंकले आहे.  

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला चांगलाच जोर आला आहे. मात्र, औरंगाबादमध्ये अद्यापही आघाडीचा उमेदवार ठरला नाही. त्यामुळे खोतकरांचा बाण भात्यात गेल्यानंतर येथून कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल असे दिसून येते. कारण, काँग्रेसकडून औरंगाबादमध्ये कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला दावा केला आहे. चंद्रकांत खैरे याच्याविरुद्ध ते निवडणुकींच्या आखाड्यात शड्डू ठोकण्याची शक्यता आहे. याआधी सुभाष झांबड यांचे नाव काँग्रेसकडून चर्चेत होते. परंतु, आता हर्षवर्धन जाधव यांचे नाव पुढे आले असून खुद्द हर्षवर्धन जाधव यांनीही याबाबत लोकमतशी बोलताना होय मी उभं राहणारच, असे म्हटले आहे. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेच्या मैदानात चांगलीच रंगत वाढणार आहे. कारण, जाधव हे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई आहेत. तर, शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दावने औरंगाबादमध्ये सभा घेऊ शकतात. त्यामुळे, या निवडणुकीत खैरेंविरुद्ध जाधव असा सामना पाहायला मिळताना, सासरे विरुद्ध जावई अशीही मॅच दिसून येईल.  

मराठा आरक्षणावरून शिवसेनेला धारेवर धरणारे हर्षवर्धन यांनी आधीच औरंगाबादेतून लोकसभा लढविण्यासाठी दंड थोटपटले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी 'शिवस्वराज्य बहुजन पक्ष' स्थापन करून लोकसभा लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच 30 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे म्हटले होते. परंतु काँग्रेसकडून त्यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मराठा मोर्चांच्या वेळी हर्षवर्धन यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली होती. त्यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यास आपल्यावर शिवसेना नेत्यांकडून प्रतिबंध लावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ते राज्य पातळीवर चर्चेत आले होते.

2009 मध्ये हर्षवर्धन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच कन्नड विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून विजय मिळवला होता. मात्र आरक्षणाच्या मुद्दानंतर आमदारकीचा राजीनामा दिला होता. दरम्यान औरंगाबादचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन यांचे मतभेद सर्वश्रूत आहेत. त्यात खैरे यांच्याविरोधात काँग्रेसकडून हर्षवर्धन यांचे नाव निश्चित झाल्यास औरंगाबादमधील लढत आणखीनच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

दानवे यांच्या भूमिकडे लक्ष

हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावाई आहे. परंतु हर्षवर्धन यांच्या लोकसभा निवडणूक लढविण्याच्या निर्णयामुळे दानवे यांची अडचण होणार आहे. त्यामुळे दानवे यांची यावर काय भूमिका असेल, याकडे लक्ष लागले आहे. 
 

Web Title: 'Yes, I will stand up', Demonstrate against Harsh Vardhan Jadhav's Chandrakant Khaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.