चोरी झाली हो ...वाल्मीच्या नदीची ! जमीन आणि नदीपात्र भूमाफियांनी हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 11:39 AM2021-01-30T11:39:59+5:302021-01-30T11:42:58+5:30
Water And Land Management Institute (WALMI), Aurangabad कांचनवाडी परिसरातील वाल्मीला दिलेल्या एकूण जागेपैकी फक्त १० टक्के जागेचा वापर झाला आहे.
औरंगाबाद : जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) ताब्यातील जमीन आणि संस्थेलगत असलेली धारीम नदीचे पात्र भूमाफियांनी हडपल्याची तक्रार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. या तक्रारीवरून उपायुक्त पराग सोमण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वाल्मीला देण्यात आलेल्या एकूण जमिनीचे मोजमाप करण्याचे आदेश दिले आहेत. जमिनीचे मोजमाप करून त्याचा अहवाल आयुक्त कार्यालयास सादर करण्याचेही आदेशात म्हटले आहे.
कांचनवाडी परिसरातील वाल्मीला दिलेल्या एकूण जागेपैकी फक्त १० टक्के जागेचा वापर झाला आहे. निवासी संकुल, संशोधन संस्था, परीक्षण केंद्र, रोपवाटीका, तलाव आदी उपक्रमांसाठी तेथे जमीन देण्यात आली होती. वरील उपक्रमांसाठी जमीन वापर केल्यानंतर उरलेली जमीन भूमाफियांनी अतिक्रमित करून बनावट दस्तावेजा आधारे विक्री करण्यात आल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत वाल्मीला दिलेल्या जमिनीची मोजणी करण्याची मागणी तक्रारकर्त्या संघटनेने केली आहे. एकूण १४ गटांतील जमीन वाल्मीसाठी देण्यात आली होती. यातील किती जमीन अतिक्रमित झाली, किती जमीन बेकायदेशीररीत्या विक्री झाली. याची माहिती एकूण मोजमाप झाल्यानंतर समोर येणे शक्य आहे. विभागीय आयुक्तांनी सदरील प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना जमीन मोजणी करण्यासाठी पत्र दिले आहे.
धारीम नदीचे पात्रही केले सपाट
वाल्मीतून वाहणाऱ्या धारीम नदीचे पात्रदेखील भूमाफियांनी सपाट केले. त्यामुळे नदीचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. सदरील नदीचे पात्र अतिक्रमित झाल्यामुळे पर्यावरणाच्या इको सिस्टिमला धक्का बसला आहे. सदरील ठिकाणी नदीचे पात्र अतिक्रमित झाले आहे काय, याचीदेखील मोजणी आयुक्तालयाच्या आदेशाने करण्यात येणार आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, वाल्मी जमीन अतिक्रमणप्रकरणी माझ्याकडे तक्रार आली, जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत मोजणी करण्यासाठी पत्र दिले आहे.