पहिल्या दिवशी २२ % विद्यार्थ्यांचे 'येस सर'; औरंगाबाद ग्रामीणमध्ये 406 शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:04 PM2020-11-24T12:04:16+5:302020-11-24T12:09:35+5:30
वाळूज, बजाजनगर, रांजणगाव परिसरातील शाळा सुरु करण्यास तेथील स्थानिकांसह ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला.
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नववी ते बारावीच्या ५८५ पैकी ४०६ शाळा सोमवारी सुरू झाल्या. पहिल्या दिवशी १७ हजार २७५ म्हणजे २२ टक्के विद्यार्थी पालकांच्या संमतीने शाळेत आले. १७९ शाळा विविध कारणांनी सोमवारी सुरू होऊ शकल्या नाहीत.
राज्य शासनाने दिलेले आदेश व जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नववी ते बारावीचे ग्रामीण भागातील वर्ग सुरु झाले. जिल्हा परिषदेच्या ५५ माध्यमिक शाळा आहेत. तर ५३५ शाळा या संस्थांच्या आहेत. यातील तपासणी झालेल्या शिक्षकांचे अहवाल सोमवारपर्यंत उपलब्ध झाले नव्हते. शिक्षणविभागाकडून त्यांना रिपोर्ट येईपर्यंत शाळेत उपस्थित होऊ नये अशा सूचना दिल्या होत्या. मंगळवारपर्यंत बहुतांश अहवाल मिळतील. त्यानंतर शिक्षक हजर होऊन सुरु न झालेल्या शाळाही सुरु होतील. तर सुमारे ७०० शिक्षकांनी अद्याप तपासणी करुन घेतली नाही. त्यांनीही तात्काळ तपासणी करुन शाळेत हजर व्हावे असे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी केले.
शहरालगतच्या गावांत शाळा सुरु करण्यास विरोध
वाळूज, बजाजनगर, रांजणगाव परिसरातील शाळा सुरु करण्यास तेथील स्थानिकांसह ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला. मात्र, जिल्हाधिकारी यांच्याकडून अद्याप त्या शाळासंदर्भात कोणतेही स्वतंत्र आदेश नाही, असेही डाॅ. चव्हाण यांनी सांगितले.
शहरात ३०, तर ग्रामीणमध्ये ७० टक्के खाजगी शिकवण्या सुरू केल्याचा दावा
शहरातील ३० टक्के, तर ग्रामीणमधील ७० टक्क्यांपेक्षा अधिक खाजगी शिकवण्या, कोचिंग क्लासेस सोमवारपासून सुरू केल्याची माहिती कोचिंग क्लासेस असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर यांनी दिली. आई, वडील, विद्यार्थ्यांचे हमीपत्र, आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, शासनाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन यात केले असून पुढील दोन- तीन दिवसांत बहुतांश क्लासेस सुरू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या ८ महिन्यांपासून क्लासेस बंद असल्याने त्यावर उदरनिर्वाह असणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. शाळांप्रमाणे क्लासेसही सुरू करावेत अन्यथा आत्मदहनाचा इशारा संघटनांनी दिला होता. त्यासाठी आंदोलनेही केली, तरीदेखील शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने अखेर क्लासेस चालकांनी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरू झालेल्या क्लासेसमध्ये प्रामुख्याने दहावी व बारावीच्या क्लासेसचा समावेश आहे. राज्यभरात ५० टक्के क्लासेस सुरू झाल्याचे मांडकीकर यांनी कळविले आहे. खाजगी शिक्षकांनीही तपासण्या करून घेऊन ज्ञानदान सुरू केल्याचा दावा त्यांनी केला. लवकरच शाळा, महाविद्यालयांप्रमाणे कोचिंग क्लासेस सुरू करण्यासंदर्भात सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणीही कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे करण्यात आली.
शहरात ५९८ शिक्षकांची कोरोना टेस्ट
शहरातील माध्यमिक विभागाच्या शाळा ३ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, शिक्षकांना शाळेत जाणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना तपासणी सक्तीची केली आहे. सोमवारी ५९८ शिक्षकांची तपासणी करण्यात आली. रविवारी २९८ शिक्षकांची तपासणी झाली होती. त्यामध्ये १८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले. आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत.