होय, आम्हाला प्रमोशन नको, पदावनत करा; १३२ शिक्षकांचे शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल
By राम शिनगारे | Published: February 13, 2024 12:28 PM2024-02-13T12:28:18+5:302024-02-13T12:28:25+5:30
जि.प.च्या शिक्षकांनी काही वर्षांपूर्वी आनंदाने पदवीधर शिक्षकांची पदोन्नती घेतली होती.
छत्रपती संभाजीनगर : प्रत्येकाला आपली लवकरच पदोन्नती व्हावी, अशी इच्छा असते. त्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, छत्रपती संभाजीनगर जि.प.च्या अंतर्गत असलेल्या शाळांमधील तब्बल १३२ शिक्षकांनी पदोन्नती नव्हे तर झालेली पदोन्नती रद्द करून पदावनत करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून मंगळवारी शिक्षकांना पदावनत करण्याची प्रक्रिया जि.प.च्या वेरुळ सभागृहात पार पडणार आहे.
जि.प.च्या शिक्षकांनी काही वर्षांपूर्वी आनंदाने पदवीधर शिक्षकांची पदोन्नती घेतली होती. त्यातील अनेक शिक्षक वाद-विवाद, ताणतणाव, दैनंदिन पत्रव्यवहारासाठी करावा लागणारा प्रवास, शालेय पोषण आहार योजना राबविताना येणाऱ्या अडचणी, प्रभारी मुख्याध्यापकाच्या अतिरिक्त पदभारामुळे त्रस्त आहेत. त्यातील अनेकांना आजारही जडले आहेत. त्याशिवाय पदोन्नती झाल्यामुळे अनेकांच्या शहरापासून ग्रामीण, दुर्गम भागात बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागतो, अशीही काही कारणे आहेत.
त्यामुळे तीन वर्षांपासून अनेक शिक्षकांनी पदावनत करण्याची मागणी शालेय शिक्षण विभागाकडे केली होती. त्यावर अखेर शिक्षण विभागाने पदावनत प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी जि.प.च्या वेरूळ सभागृहात पदावनत करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. पदावनत केल्यानंतरही शिक्षकांच्या पगारात कोणताही फरक पडणार नाही. जेवढा पगार सध्या मिळतो, तेवढाच पगार पदावनत केल्यानंतरही संबंधित शिक्षकांना मिळणार आहे. शिक्षकांच्या मागणीनुसार संबंधितांना पदावनत करावे, अशी मागणीही राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे, जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे, कैलास गायकवाड, बाबासाहेब जाधव, सचिन एखंडे, प्रशांत हिवर्डे आदींनी केली आहे.
शिक्षकांकडून दाखल केलेले प्रस्ताव
तालुके.......शिक्षकांची संख्या
कन्नड..............३३
सिल्लोड...........२३
पैठण...............१९
फुलंब्री.............१८
वैजापूर............१७
गंगापूर.............१२
सोयगाव...........०७
खुलताबाद.........०३