पीक फेरपालट केल्याने उत्पन्न वाढले पाचपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:05 AM2021-01-03T04:05:36+5:302021-01-03T04:05:36+5:30
योगेश पायघन औरंगाबाद : जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे. अतिवृष्टी, त्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे ५० टक्क्यांहून अधिक कपाशी क्षेत्र बोंडअळीच्या ...
योगेश पायघन
औरंगाबाद : जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे. अतिवृष्टी, त्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे ५० टक्क्यांहून अधिक कपाशी क्षेत्र बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पहिल्या पेरणीतच उपटावे लागले. अशातच गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथील शेतकरी मानसिंग सुंदरडे यांनी तीन एकरावर पिकाची फेरपालट करून तूर लावली. या तुरीने खर्च जाऊन दीड लाखाचे उत्पन्न दिल्याने नुकसानीतून बचावल्याची भावना ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
सुंदरडे म्हणाले, गेल्या वीस वर्षांपासून कपाशीच लागवड करत होते. सुरुवातील चांगले उत्पन्न मिळाले; पण शेवटी शेवटी २० ते २२ क्विटंलपेक्षा अधिक उत्पन्न तीन एकर १५ गुंठ्यांत मेहनत करूनही हाती ३० ते ३५ हजारांपेक्षा अधिक रक्कम उरत नव्हती. दरम्यान, विभागीय कृषी विस्तार केंद्रात भेट दिली. तेथील रामेश्वर ठोंबरे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार व डाॅ. सूर्यकांत पवार आणि डाॅ. दीपक पवार यांच्या मदतीने मी पीक फेरपालट करण्याचा निर्णय यावर्षी घेतला. २० जूनला परभणी येथील डाॅ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ७११ या तुरीच्या सुधारित वाणाची पेरणी ३ एकर १५ गुंठे क्षेत्रावर केली. ११० दिवसांत पीक काढणी, मळणीनंतर ३२ क्विंटल ३५ किलो तूर विकली. त्याला ५ हजार ४०० रुपये भाव मिळाला. खत औषधीला ५ हजारांपेक्षा कमी खर्च लागला. कापणीला ५ आणि मळणीला १० हजार खर्च आला, तर उरलेल्या तुरीच्या भुसाला १० हजारांत मागणी आहे.
चौकट...
आता तीळ पेरणीची तयारी
पीक फेरपालट केल्याने आता रबीचे पीकही घेता येणार आहे. शेतात पडलेला पालापाचोळ्याचा पुढच्या पिकांना फायदा होईल. यंदा पाणीही आहे. त्यामुळे ठिबकवर तीळ लावण्याची तयारी करत आहे. त्यातूनही काहीशी रक्कम हाती येईलच, असा विश्वास व्यक्त करत आतापर्यंत माझ्या शेतीकडे कधी न फिरकणारे लोकही येऊन विचारपूस करत आहे. शिवाय तूर लागवडीची माहिती घेत आहेत. हे सुखावह आहे.
-मानसिंग सुंदरडे, शेतकरी
फोटो ओळ :
मनोहर सुंदरडे यांच्या शेतातील तुरीचे पीक दाखवताना विभागीय कृषी विस्तार केंद्राचे रामेश्वर ठोंबरे.