रुग्णालयांत औषधी, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह रुग्णांना ‘योगा’ची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:02 AM2021-06-21T04:02:02+5:302021-06-21T04:02:02+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : योगा, प्राणायाम करायचे म्हटले की, मोकळी जागा, व्यायामशाळा, उद्यान अशाच काही जागा डोळ्यांसमोर येतात; परंतु ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : योगा, प्राणायाम करायचे म्हटले की, मोकळी जागा, व्यायामशाळा, उद्यान अशाच काही जागा डोळ्यांसमोर येतात; परंतु गेल्या दीड वर्षापासून शहरातील रुग्णालयांमध्ये कोरोनासारख्या महाभयंकर आजाराला सामोरे जाणाऱ्या रुग्णांनी योग साधना जोपासली. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि विविध औषधींबरोबर रुग्णांच्या उपचारात ‘योगा’ची साथ मिळाली. योग शिक्षक बनून डाॅक्टर, परिचारिका रुग्णांना उपचाराबरोबर योग साधनेतून रुग्णांत आत्मविश्वास, सकारात्मकता निर्माण करण्याचे काम करीत आहेत.
दीड वर्षापूर्वी महाभयंकर अशा कोरोनाने प्रवेश केला आणि एकच हाहाकार माजविला. अनेकांचे आयुष्य या महारोगाने उद्ध्वस्त केले, जवळच्या व्यक्तींना हिरावून घेतले. आजाराची अन् मृत्यूच्या भीतीची धडधड प्रत्येकाच्या मनात सुरू झाली; पण त्यातूनच जगण्याचा नवा धडाही कोरोनाने शिकविला. आयुष्यात आरोग्याला अग्रक्रम आला. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेकांची मनस्थिती खालावते. अशावेळी रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण करणे महत्त्वपूर्ण ठरते. योगा, प्राणायाम यांच्या माध्यमातून हे साध्य होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
घाटी रुग्णालयात निवासी डाॅक्टर, स्टाफ नर्स, विभागप्रमुख अशा सर्वांनी पुढाकार घेत काेराेना रुग्णांना योगाचे धडे दिले. ऑक्सिजन मास्क असतानाही अनेक रुग्णांकडून शक्य तेवढ्या प्रमाणात योगा, प्राणायाम, हलके व्यायाम करून घेण्यावर भर देण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयातही रुग्णांकडून प्राणायाम करून घेतले जातात. घरी गेल्यानंतर त्यात सातत्य ठेवण्यावर रुग्णांकडून भर दिला जात आहे.
-----
घराघरात योगा, प्राणायाम
योगा, प्राणायाम यामुळे कोरोना बरा होतो का नाही, हा प्रश्न नेहमीच चर्चीला जातो; परंतु कोराना काळात घराघरात सकाळ-संध्याकाळ योगा, प्राणायाम करण्याचे प्रमाण वाढले. लहान मुलांपासून तर ज्येष्ठ व्यक्ती व्यायामाकडे वळले आहेत.
------
रुग्णांना मार्गदर्शन
कोरोनाच्या अतिसौम्य रुग्णांना हालचाली आणि फुप्फुस सक्षम करण्यासाठी प्राणायाम, जसे दीर्घ श्वासांची मोजणी, शितकरी, अनुलोम-विलाेम, प्राणायाम, सूक्ष्म योगा आदींसंदर्भात रुग्णांना मार्गदर्शन करण्यात येते. रुग्णालयात दाखल असताना त्यांच्याकडून करून घेण्यावर भर देण्यात येतो. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर नियमितपणे योगा, प्राणायाम करण्याचे सांगितले जाते.
- डाॅ. प्राची काटे, फिजिओथेरपिस्ट, जिल्हा रुग्णालय
------
योगा, प्राणायाम करण्याचे प्रमाण वाढले
कोरोनाकाळात योगा, प्राणायाम करण्याचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. प्रकृतीनुसार शक्य तेवढ्या प्रमाणात योगा केला पाहिजे. रुग्णालयात दाखल रुग्ण, पोस्ट कोविड रुग्णही त्याकडे वळाले आहेत. योगाने रुग्ण बरा होतो, असे म्हणता येणार नाही; पण औषधीप्रमाणे योगा नक्की महात्त्वपूर्ण ठरत आहे. नागरिक आता स्वत:च्या आरोग्याकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत.
- डॉ. जयंत बरिदे, निवृत्त प्राध्यापक, योग-अभ्यासक
----
स्नायू बळकट होण्यास मदत
रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांना योगा शिकविण्यात येतो. योगा म्हणजे फक्त व्यायाम नाही. अष्टांग योगा हा खरा योगा आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर राहिलेल्या कोरोना रुग्णांकडून उपचाराच्या दुसऱ्या आठवड्यात छातीचे स्नायू बळकट करण्यासाठी हाताचे व्यायाम, श्वासाचे व्यायाम माझ्यासह लेक्चरर, निवासी डाॅक्टर, स्टाफ नर्स करून घेतात.
- डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी
-------
१) जिल्हा रुग्णालयात रुग्णांना प्राणायाम शिकविताना फिजिओथेरपिस्ट डाॅ. प्राची काटे.
२)घाटीत ऑक्सिजनवरील रुग्ण योगासन करताना.
३)घाटीत दाखल कोरोना रुग्ण योगा, प्राणायाम करताना.