योगगुरु रामदेव बाबांनी ‘सीआयएसएफ’च्या जवानांना दिले विमानतळावर योगासनाचे धडे
By संतोष हिरेमठ | Published: January 30, 2023 08:17 PM2023-01-30T20:17:37+5:302023-01-30T20:19:16+5:30
‘सीआयएसएफ’च्या जवानांच्या आग्रहाखातर त्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके दाखवली.
औरंगाबाद : योगगुरु रामदेव बाबा यांनी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर योगासने करीत ‘सीआयएसएफ’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना योगासनांचे धडे दिले.
चिकलठाणा विमानतळावर सोमवारी रामदेवबाबांचे आगमन झाले असता ‘सीआयएसएफ’चे डेप्युटी कमांडंट पवन कुमार आणि सहायक कमांडंट लक्ष्मीकांत शिंदे यांच्या विनंतीवरून त्यांनी ‘सीआयएसएफ’च्या अधिकारी- जवानांशी संवाद साधला. जीवनात योगासनाचे महत्त्व सांगितले. ‘सीआयएसएफ’च्या जवानांच्या आग्रहाखातर त्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके दाखवली. आपल्या योग कौशल्याने सर्वांची मने जिंकून घेतली.
शरीराबरोबरच मानसिक स्वास्थ्यासाठीही योग अत्यावश्यक आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. याप्रसंगी निरीक्षक प्रमोद जावळे, पी. के. सिंग, प्रभात कुमार, महिला उपनिरीक्षक प्रीती जसवाल, सरिता कुमारी, आरती, उपनिरीक्षक मनोज कुमार, हिर्देश कुमार, रवींद्र सिंह, अमन कुमार, मोहित नेगी, वसंत सोनवणे, वसंत गिते, अवतार सिंग, अमोल शिंदे, श्रीहरी जगदाळे, रावसाहेब शिंदे, भीमराव गायकवाड, संदेश पाटील आदी उपस्थित हाेते.