योगाच्या विद्यार्थ्यांची कुलगुरूंकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:12 AM2019-05-29T00:12:55+5:302019-05-29T00:13:27+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी योगशास्त्र पदव्युत्तर परीक्षेतील सामूहिक कॉपीप्रकरणी कारवाईचा इशारा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी धाव घेत बाजू मांडली. परीक्षेतील गैरप्रकारांची योग्य चौकशी केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले. विद्यापीठ प्रशासन चौकशी करीत असून, दोषी नसलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी स्पष्ट केले. योगशास्त्र विभागप्रमुखपदी डॉ. सुधाकर शेंडगे यांची नियुक्ती केली आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी योगशास्त्र पदव्युत्तर परीक्षेतील सामूहिक कॉपीप्रकरणी कारवाईचा इशारा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी धाव घेत बाजू मांडली. परीक्षेतील गैरप्रकारांची योग्य चौकशी केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले. विद्यापीठ प्रशासन चौकशी करीत असून, दोषी नसलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी स्पष्ट केले. योगशास्त्र विभागप्रमुखपदी डॉ. सुधाकर शेंडगे यांची नियुक्ती केली आहे.
विद्यापीठातील योगशास्त्र विभागाच्या सामूहिक कॉपी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. योगशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेच्या पहिल्या पेपरला एका बाकावर दोन विद्यार्थी बसले होते. बहुतेक विद्यार्थ्यांनी कॉपी केली. हा सामूहिक कॉपीचा प्रकार फाईन आर्ट विभागाच्या सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने अद्याप सीसीटीव्ही फुटेज तपासले नसल्यामुळे कॉपीबहाद्दरांचा शोध लागला नाही. योगशास्त्र विभागाचे विभागप्रमुख बदलणार असल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सोमवारी जाहीर केले, तसेच कॉपीचा प्रकार घडला असल्यामुळे परीक्षेबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. या प्रकारामुळे योगशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू आणि प्रकुलगुरूंची भेट घेऊन म्हणणे मांडले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे उपस्थित होते. प्रशासन चौकशी करीत असून, योग्य निर्णय घेण्यात येईल. दोषी नसलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे प्रकुलगुरू डॉ. तेजनकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना एकत्रित करून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका विद्यार्थी संघटनांनी केली. योगशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्मिता साबळे यांची परवानगी नसताना परीक्षा केंद्र परस्पर फाईन आर्ट विभागात हलवण्यात आले होते. परीक्षा केंद्र बदलण्याचा निर्णय कोणी घेतला? हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. सीसीटीव्ही फुटेज देण्याबाबत फाईन आर्ट विभागप्रमुख डॉ. शिरीष अंबेकर टाळाटाळ का करीत आहेत, अशी विचारणा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली. या प्रकारात डॉ. स्मिता साबळे यांचा हलगर्जीपणा दिसला आहे. मनमानी कारभार करून स्वत: परीक्षार्थी असलेले डॉ. जयंत शेवतेकर आणि डॉ. शिरीष अंबेकर यांच्यावर संघटित गुन्हेगारीअंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली. कुलगुरूंना दिलेल्या निवेदनावर अमोल दांडगे, दीपक बहिर, आकाश हिवराळे, अक्षय गुरव, दीक्षा पवार यांची स्वाक्षरी आहे.