लोकांसाठी तुम्हीच 'राजसाहेब' आहात; अमित ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र!
By मुकेश चव्हाण | Published: October 13, 2022 07:34 PM2022-10-13T19:34:17+5:302022-10-13T19:35:02+5:30
मनसेचे नेते अमित ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.
- मुकेश चव्हाण
मनसेचे नेते अमित ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज अमित ठाकरे यांनी औरंगाबादमधील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जाणवणारी वसतिगृहाची समस्यांचे प्रश्न मनसेने हाती घ्यावे, असं अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
पक्षाचे इथले स्थानिक पदाधिकारी तुम्ही आहात. लोकांसाठी या जिल्ह्यातले, तालुक्यातले, गावातले 'राजसाहेब' तुम्हीच आहात. स्वत:ची जबाबदारी ओळखा. स्थानिक पातळीवर काम करणं, योग्य ते निर्णय घेणं, लोकांपर्यंत राज ठाकरेंचे विचार पोहोचवणं ही तुमची जबाबदारी आहे, असं अमित ठाकरे पदाधिकाऱ्यांना म्हणाले.
राज्यात एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडी असा राजकीय वाद रंगला असतानाच, दुसरीकडे मनसेकडून मात्र आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने तयारी करण्यात येत आहे. अमित ठकारे राज्यातील वेगवेगळ्या विभागाचा टप्या-टप्याने दौरा करत आहे. तर खुद्द राज ठाकरे सुद्धा अधूनमधून महत्वाच्या शहराचा दौरा करत कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण करतायत. त्यामुळे आगमी स्थानिक निवडणुकीत मनसे मोठ्या तयारीने उतरण्याची शक्यता आहे. तर पक्षातील नेत्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साहा पाहायला मिळत आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीची तयारी सध्या सुरू आहे. कोण तयारी करीत आहे, हे सांगितले, तर इतर पक्ष त्यांच्यावर लक्ष ठेवतील. सध्या परिस्थिती कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची पळवापळवीची आहे. त्यामुळे २७ वॉर्डात मनसे लढणार, परंतु उमेदवारांची नावे ऐन वेळीच जाहीर करणार असल्याचे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर खांबेकर यांनी सांगितले.