'तू मर आणि मला मुक्त कर'; कंपनीतील मुलीसोबत अनैतिक संबंधातून पत्नीस केले आत्महत्येस प्रवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 05:43 PM2021-10-27T17:43:40+5:302021-10-27T17:46:30+5:30
कुटुंबाने बळजबरीने लग्न लावून दिल्याचा पतीचा दावा
औरंगाबाद : नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा आणि अनैतिक संबंधाला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार आईने वेदांतनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरून पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नवऱ्याविरुद्ध नोंदविण्यात आला.
चिकलठाणा एमआयडीसीतील कंपनीत अभियंता व पदमपुरा भागातील रहिवासी विवाहितेने पाच दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
भाड्याने राहणारा अंकुश शिवाजी सूर्यवंशी (मूळ गाव रा. किट्टी आडगाव, ता. माजलगाव, जि. बीड, ह.मु. सुयोग कॉलनी, पदमपुरा) याची पत्नी मेघनाने २१ ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाइकांनी मेघनाचा मृतदेह वेदांतनगर पोलीस ठाण्यात नेऊन नवऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मेघनाची आई उषा सूर्यवंशी यांनी २५ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार मेघनाचा पती अंकुशविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, अंकुशचे कंपनीतील सहकारी मुलीसोबत अनैतिक संबंध होते. कुटुंबाच्या दबावापोटी विवाह केल्याचे त्याने मेघनाला अनेक वेळा सांगितले, तसेच त्या मुलीसोबतचे छायाचित्रही त्याने पत्नीला दाखविले. तेव्हापासून तो पत्नीला शारीरिक, मानसिक त्रास देत होता. लग्नात टी.व्ही., फ्रीज, सोफासेट, गॅस, कूलर दिलेला नाही म्हणून अंकुश हा माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी पत्नीला त्रास देत होता, असेही फिर्यादीत म्हटले आहे. उपनिरीक्षक प्रमोद देवकते पुढील तपास करीत आहेत. दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
तू मर आणि मला मुक्त कर
अंकुश हा मेघनाला घटस्फोट घेण्यासाठी सतत आग्रह करीत होता. मेघना त्याला सांगत होती, आपले लग्न ८ महिन्यांपूर्वीच झाले आहे. तुम्ही आधीच माझ्याबरोबर लग्न करायला नको होते. आम्ही चांगले लोक आहोत. सोडचिठ्ठी दिल्यास समाजात बदनामी होईल. मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असे म्हटल्यावर अंकुश हा मेघनाला म्हणत असे की, तू मर आणि मला मुक्त कर, ही बाब तिने आईला सांगितल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.