'तुला घरकाम व स्वयंपाक येत नाही',म्हणत पत्नीला जिवंत पेटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 03:37 PM2019-05-29T15:37:00+5:302019-05-29T15:43:43+5:30
महिलेचा उपचारादरम्यान १० दिवसानंतर झाला मृत्यू
सिल्लोड (औरंगाबाद ) : 'तुला घरातील कामकाज येत नाही, स्वंयंपाक येत नाही' यावरून वाद झाल्याने पतीने रागाच्या भरात पेटवून दिलेल्या महिलेचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. वर्षभरापासून पती आणि सासरची मंडळी महिलेचा छळ करत असत. दि. १८ मे पासून औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरू होते.
प्रिया धम्मपाल शेजवळ ( 25, रा. अंधारी ) मृत महिलेचा नाव आहे. १८ मे ला गंभीररित्या जळालेल्या अवस्थेत औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तिने पति धम्मपाल व सासरच्या लोकांविरोधात तक्रार दिली होती. यावरून पोलिसांनी धम्मपाल उत्तम शेजवळ, सासु अरुणाबाई व मामा विजय वानखेड़े ( सर्व रा अंधारी) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. पुढील तपास फौजदार सावंत करत आहेत.
याबाबत प्रिया हिने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, प्रिया व धम्मपाल यांचे २०१७ ला लग्न झाले. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच पती धम्मपाल आणि सासरची मंडळी प्रियाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असत. यामुळे प्रियाने वर्षभरापूर्वी महिला तक्रार निवारण केंद्रात पती आणि सासरच्या विरोधात तक्रार दिली. येथे समुपदेशनानंतर ती मागील महिन्यात परत सासरी आली. मात्र सासरच्या मंडळीकडून त्रास सुरुच होता. दि. १८ मे ला सकाळी 'तुला घरातील कामकाज येत नाही, स्वंयंपाक येत नाही' असे म्हणत धम्मपाल याने वाद घालणे सुरु केले. यावेळी घरातील सासू अरुणाबाई, मामा विजय वानखेडे आणि पती धम्मपाल यांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. प्रिया त्याच अवस्थेत घराबाहेर आली असता शेजाऱ्यांनी पाणी टाकून आग विझवली. गंभीर जखमी अवस्थेत प्रियाला शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.