पाणीपुरी खाताय, टायफॉइड घरी घेऊन तर जात नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:02 AM2021-08-14T04:02:07+5:302021-08-14T04:02:07+5:30
बापू सोळुंके औरंगाबाद : पाणीपुरी खात असाल तर खबरदार... तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीमुळे टायफॉइडला निमंत्रण देऊन ...
बापू सोळुंके
औरंगाबाद : पाणीपुरी खात असाल तर खबरदार... तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीमुळे टायफॉइडला निमंत्रण देऊन घरी घेऊन जात तर नाहीत ना? पाणीपुरीचे पाणी दूषित असेल तर तुम्हाला टायफॉइड होण्याचा धोका आहे. पाणीपुरी विक्रेता, हॉटेलमध्ये अन्न पदार्थ तयार करणारा अथवा वाढणाऱ्या व्यक्ती टायफॉइड जंतूचा वाहक असेल तर तुम्हालाही टायफॉइड अर्थात विषमज्वराची लागण होऊ शकते.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, कॉलरासोबतच टायफॉइडची साथही वाढीस लागते. टायफॉइड जंतूचे वाहक असलेल्या व्यक्तीच्या हस्ते खाद्यपदार्थ सेवन केले अथवा दूषित पाणी सेवन केल्यामुळे टायफॉइड होतो. या आजारात सुरुवातीला ताप येण्यास सुरुवात होते. यानंतर हगवण लागते. टायफॉइडच्या रुग्णाचा ताप वाढत असतो. यामुळे रुग्ण अत्यंत कमकुवत होतो. तापेच्या रुग्णाला टायफॉइडची लागण झाली अथवा नाही, हे पाहण्यासाठी विडाल चाचणी करावी लागते. सुरुवातीला आठ दिवस ताप असलेल्या रुग्णालयाच्या रक्तनमुन्याची चाचणी टायफॉइड पॉझिटिव्ह येत नाही. असे असले तरी डॉक्टर रुग्णाला टायफॉइडची लक्षणे दिसत असल्यास टायफॉइडचेच औषधोपचार सुरू करतात. यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. तापेवरील औषधी टायफॉइडच्या उपचारासाठी उपयुक्त ठरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ९५ टक्के रुग्ण खाजगी रुग्णालयात टायफॉइडवर उपचार घेऊन बरे होतात. आठ ते दहा दिवस उपचार केल्यानंतरही ताप उतरत नसेल तर रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या(घाटी) मेडिसिन विभागात दाखल होतात. पावसाळ्यात घाटीतील टायफॉइड रुग्णसंख्या वाढत असल्याचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी नमूद केले.
-------------------------------------------
काय आहेत आजाराची लक्षणे
१) ताप येणे
२) आठ ते दहा दिवस ताप चढत राहणे.
३) पोट दुखणे
४) संडास लागणे
-------------------------------------------------------
काय घ्यावी काळजी
१) दूषित पाणी पिण्याचे टाळावे.
२) पाणीपुरीचे पाणी दूषित असू शकते; शिवाय पाणीपुरी विक्रेत्याचा स्पर्श पाण्याला आणि पाणीपुरीला होतो, अशा ठिकाणी पाणीपुरी खाऊ नये.
३) स्वच्छता असलेल्या हॉटेल्स, ढाबे अशा ठिकाणी जेवण करा.
४) तापेमुळे फणफणत असलेल्या व्यक्तीने बनविलेले पदार्थ खाऊ नयेत.
------------------------------
घाटी रुग्णालयातील रुग्ण संख्या
जून- १५
जुलै- १७
ऑगस्ट- ७
----------------------------------------
कोट
वर्षभर टायफॉइडचे रुग्ण घाटीत दाखल होतात. काही लोक टायफॉइडचे वाहक असतात. ताप येतो, पोट दुखणे, हगवण लागणे आदी लक्षणे रुग्णांत दिसतात. शिवाय या रुग्णांचा ताप सतत चढत असतो. दूषित पाणी पिल्याने आणि टायफॉइडचे जंतू वाहक असलेल्या व्यक्तीने दिलेले अथवा तयार केलेले पदार्थ खाल्ल्यास टायफॉइडची लागण होण्याचा धोका असतो. विशेषत: पाणीपुरीतून टायफॉइडचा प्रसार होत असल्याचे दिसून येते. बाहेर खाल्ल्याशिवाय पर्याय नसेल तर कमीतकमी गरम पदार्थ खावेत.
- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभाग प्रमुख, घाटी रुग्णालय.