‘तू माझ्या आईला मारले...’; आईच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीवर मुलाचा कुऱ्हाडीने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 07:40 PM2024-08-16T19:40:12+5:302024-08-16T19:41:22+5:30

पैठण तालुक्यातील घटना; जखमीवर उपचार सुरू

‘You killed my mother...’; To avenge the murder of the mother, the son attacked the accused with an ax | ‘तू माझ्या आईला मारले...’; आईच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीवर मुलाचा कुऱ्हाडीने वार

‘तू माझ्या आईला मारले...’; आईच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीवर मुलाचा कुऱ्हाडीने वार

पैठण : तालुक्यातील वडवाळी येथे तीन वर्षांपूर्वी एका महिलेचा अनैतिक संबंधातून खून झाला होता. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाने आईच्या खुनाच्या बदला घेण्याच्या उद्देशाने या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास घडली. जखमीवर घाटी येथे उपचार सुरू आहेत.

वडवाळी येथे तीन वर्षांपूर्वी गावातील गंगुबाई विठ्ठल कोरडे (वय ३८ वर्षे) या महिलेचा अनैतिक संबंधातून खून झाला होता. या प्रकरणी याच गावातील महादेव विनायक मैदड (वय ४० वर्षे) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होता. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असून, आरोपी जामिनावर सुटला आहे. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास गावातील एका ठिकाणी मृत गंगुबाईचा मुलगा परमेश्वर उर्फ शुभम विठ्ठल कोरडे याने महादेव विनायक मैदड याला गाठून ‘तू माझ्या आईला मारले, मी तुलाही कुऱ्हाडीने तोडून मारीन,’ म्हणून त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर परमेश्वर तेथून निघून गेला. यावेळी गंभीर जखमी महादेव मैदड हा रक्तबंबाळ होऊन पडला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महादेवची पत्नी संगीता व आईने धाव घेत त्याला पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अधिक गंभीर झाल्यामुळे तेथून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी संगीता महादेव मैदड यांच्या फिर्यादीवरून आरोपी परमेश्वर उर्फ शुभम कोरडे याच्यावर पोलिसांनी रात्रीच गुन्हा दाखल केला.

आरोपी स्वत:च पोलिस ठाण्यात हजर
या प्रकरणातील आरोपी परमेश्वर उर्फ शुभम कोरडे याने महादेव मैदड याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्यानंतर स्वत:च पैठण पोलिस ठाण्यात रात्री हजर झाला. त्यानंतर त्याला बुधवारी पैठण येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: ‘You killed my mother...’; To avenge the murder of the mother, the son attacked the accused with an ax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.